जनतेचे ऋण फेडण्याची संधी गमावणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 06:00 AM2019-12-09T06:00:00+5:302019-12-09T06:00:11+5:30
दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून केवळ धानाच्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र दिवसेंदिवस धानाचे उत्पादन कमी होत असून लागवड खर्चाच्या तुुलनेत भाव सुध्दा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी धानाच्या शेतीला पर्याय शोधून इतर पर्यायी पिके घेण्याची गरज आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करुन शेतकऱ्यांनी समृध्द होण्याचा सल्ला खा.प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जनतेने सदैव आपल्याला प्रेम दिले. त्यांनी नेहमीच आपल्यावर विश्वास व्यक्त केला. विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न मार्गी लावण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा संविधानानुसार पुरेपुर उपयोग करु. जनतेचे ऋण फेडण्याची संधी आता गमाविणार नसल्याची ग्वाही दिली. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सत्कार म्हणजे एका नव्या पर्वाची सुरूवात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
गोंदिया-भंडारा जिल्हा नागरिक सत्कार समितीतर्फे रविवारी (दि.८) स्थानिक सुभाष शाळेच्या मैदानावर नाना पटोले व सर्व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रफुल्ल पटेल होते. या वेळी प्रामुख्याने सत्कारमूर्ती आ.विनोद अग्रवाल,विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, सहषराम कोरोटे, राजू कारेमोरे, नरेंद्र भोंडेकर, आरपीआयचे अध्यक्ष राजेंद्र गवई, माजी खा.मधुकर कुकडे, माजी मंत्री नाना पंचबुध्दे, माजी जि.प.अध्यक्ष टोलसिंगभाऊ पवार, अशोक अग्रवाल, रत्नमाला दिदी, माजी आ. राजेंद्र जैन, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, के. आर. शेंडे, पी.जी.कटरे, पंचम बिसेन, गंगाधर परशुरामकर व नागरिक सत्कार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले, विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर बसल्यानंतर या खुर्चीची ताकद काय आहे कळले. या खुर्चीच्या माध्यमातून केवळ भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचे काम करणार आहे. या दोन्ही जिल्ह्यात शेतकरी, सिंचन, उद्योग आणि बेरोजगारीचे अनेक प्रश्न आहे. हे प्रश्न सर्वांच्या माध्यमातून कसे मार्गी लावता येतील यालाच आपले प्राधान्य असणार आहे. सर्व पक्षीय आमदार या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले असून अशीच भूमिका त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी ठेवल्यास विकासाची गंगा या दोन्ही जिल्ह्यात येण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. अध्यक्ष हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो तर तो सर्वांचा असतो त्यामुळे या खुर्चीच्या माध्यमातून योग्य तो न्याय देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच हा कार्यक्रम म्हणजे भविष्याची नांदी असल्याचे सांगत हे दोन्ही जिल्ह्यासाठी शुभ संकेत असल्याचे सांगितले. राजेंद्र गवई म्हणाले, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती सर्वोच्य स्थानी गेल्याचा आनंद असून नाना पटोले हे निश्चितच या पदाला न्याय देतील.
त्यांच्या इतिहास संघर्षाचा राहिला असून ते जनतेच्या अपेक्षांवर निश्चित खरे उतरतील असा विश्वास व्यक्त केला. या वेळी पटोले यांच्यासह सर्व आमदारांचा खा.प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन नागरिक सत्कार करण्यात आला. या वेळी शहरातील विविध सामाजिक, व्यापारी, राजकीय संस्थातर्फे पटोले यांचा सत्कार करण्यात आला.
धानाच्या शेतीला पर्याय शोधण्याची गरज
दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून केवळ धानाच्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र दिवसेंदिवस धानाचे उत्पादन कमी होत असून लागवड खर्चाच्या तुुलनेत भाव सुध्दा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी धानाच्या शेतीला पर्याय शोधून इतर पर्यायी पिके घेण्याची गरज आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करुन शेतकऱ्यांनी समृध्द होण्याचा सल्ला खा.प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांना दिला.
शहरातील खड्डयांकडेही लक्ष द्या
गोंदिया शहरातील खड्डे पाच वर्षांनंतरही कायम असल्याने शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषदेला यासाठी निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आला. मात्र यानंतरही ही समस्या कायम असून लोकप्रतिनिधी आणि नगर परिषदेने सुध्दा याकडे लक्ष द्यावे. जनतेसाठी आलेला पैसा जनतेच्या विकास कामांवर खर्च व्हावा अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि खा.प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.
या मंचावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र आल्याचा आनंद असून याचे श्रेय खा.प्रफुल्ल पटेल यांना जाते.जिल्ह्याच्या विकासासाठी असेच प्रयत्न सर्वांनी मिळून केल्यास निश्चितच कायापालट होईल.
- विनोद अग्रवाल, आमदार
...................................
खा.प्रफुल्ल पटेल आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे दोन्ही विकासाची तळमळ असणारे नेते असून त्यांच्या नेतृत्त्वात निश्चितच दोन्ही जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लागतील.
- नरेंद्र भोंडेकर, आमदार
...................................
खा.प्रफुल्ल पटेल यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा एकाच मंचावर बोलावून सत्कार करुन जिल्ह्याच्या विकासाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. ही एक चांगली सुरूवात आहे.
- विजय रहांगडाले, आमदार.
...................................
गोंदिया-भंडारा हे दोन्ही जिल्हे धान उत्पादक जिल्हे आहे. मात्र मागील काही वर्षांपासून धान उत्पादक शेतकºयांच्या समस्येत वाढ झाली आहे. राईस मिल उद्योग सुध्दा डबघाईस आला आहे. मात्र आता खा.पटेल आणि नाना पटोले यांच्या नेतृृत्त्वात हे सर्व प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास आहे.
- राजू कारेमोरे, आमदार.
...................................
देवरी तालुक्यात तीन सिंचन प्रकल्प आहेत. पण या प्रकल्पाचे पाणी याच भागातील शेतकºयांना मिळत नसल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ही समस्या आता खा.प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्या नेतृत्त्वात मार्गी लागेल असा विश्वास आहे.
- सहषराम कोरोटे, आमदार.
...................................
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे संघर्षशिल व्यक्तीमत्त्व असून ते संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करुन निश्चितच जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावतील.
- मनोहर चंद्रिकापूरे, आमदार.