दुसऱ्या डोससाठी विलंब झाल्यास घाबरु नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:30 AM2021-05-07T04:30:27+5:302021-05-07T04:30:27+5:30
केशोरी : कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस जस - जसे प्राप्त होतात तस - तसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुरु ...
केशोरी : कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस जस - जसे प्राप्त होतात तस - तसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुरु असलेल्या लसीकरण केंद्रात लसीकरण मोहीम राबविणे सुरु आहे. लसीचा पहिला डोस मिळाला. दुसरा डोस केव्हा मिळणार म्हणून नागरिक विनाकारण आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याचे प्रकार घडत आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी १२ आठवडे अंतराने लसीचा चांगला परिणाम दिसून येतो. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. विनाकारण लसीकरण केंद्रावर वाद घालू नका, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी कळविले आहे.
शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातदेखील कोरोना प्रतिबंधक लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये जागृती झाली असून, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविणे सुरु आहे. लसीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. पहिला डोस घेणारे दुसऱ्या डोससाठी विनाकारण आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. फेब्रुवारी, मार्चपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरु केले आहे. जस-जसा लसीचा पुरवठा कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड प्राप्त होत आहे. तस-तसे लसीकरण सुरु केले जाते. प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करणे, ही आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. पहिला डोस घेणारे नागरिक लसीकरण केंद्रावर दुसऱ्या डोससाठी वाद घालत आहेत. कोणत्याही नागरिकांनी लसीकरण केंद्रावर वाद घालण्याची गरज नाही. लसीच्या डोस उपलब्धतेनुसार दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सतत सुरु राहील. दुसऱ्या डोससाठी विलंब झाल्यास नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. दोन डोसमधील अंतर जेवढे जास्त होईल तसा परिणाम चांगला दिसून येत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी करून वाद घालू नये, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी कळविले.