सरसकट मोफत लसीकरण नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:27 AM2021-05-17T04:27:07+5:302021-05-17T04:27:07+5:30
गोंदिया : कोरोनावरील लस सरसकट मोफत दिली जात असल्याने खऱ्या गरजूंसह आर्थिकदृष्ट्या संपन्न नागरिकही मोफत लसीसाठी धडपडत आहे. परिणामी, ...
गोंदिया : कोरोनावरील लस सरसकट मोफत दिली जात असल्याने खऱ्या गरजूंसह आर्थिकदृष्ट्या संपन्न नागरिकही मोफत लसीसाठी धडपडत आहे. परिणामी, लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडताना दिसत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी व गरजूंना मोफत लसीचा लाभ मिळावा व लसीकरणातील अडचणीही सुटाव्या या दृष्टीने सरसकट मोफत लसीकरण नकोच, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अभय सावंत यांनी केली आहे.
कोरोनावर उपाय म्हणून आता लस आली असून देशवासीयांना ही लस शासनाकडून मोफत दिली जाणार आहे. मात्र, लस मोफत मिळत असल्याने वास्तविक खऱ्या गरजूंसह आर्थिकदृष्ट्या संपन्न नागरिकही मोफत लस मिळविण्यासाठी धडपडत आहेत. परिणामी, लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत असून लसीकरणात अडचणी निर्माण होत आहेत. शिवाय कित्येकदा लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. सध्या देशात ज्या लस दिल्या जात आहेत त्या जास्त महागड्या नसून सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात खासगी हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध होत्या. त्यामुळे खऱ्या गरजूंना लस मोफत दिली जावी व संपन्न नागरिकांना ती खासगी रुग्णालयातून पैसे घेऊन उपलब्ध करवून देण्याची गरज आहे. नागरिक ऑनलाइन दारू मागवीत असून चैनीच्या वस्तूंवर अन्य खर्च करीत आहेत. अशात त्यांना मोफत लस देण्याची गरज नसून त्याच लस गरजूंसाठी उपलब्ध होऊ शकतील. यासाठी आता सर्वच खासगी हॉस्पिटल्समध्ये लसीकरण सुरू करण्याची गरज आहे. जेणेकरून शासनाच्या लसीकरण केंद्रांवर गर्दी होणार नाही. विशेष म्हणजे, मोफत लसीसाठी सर्वच राजकीय पक्षांनीही राजकारण करू नये, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.