महाराष्ट्रात इग्नूचा 'ज्योतिषशास्त्र' विषय सुरू करू नका ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:27 AM2021-08-01T04:27:01+5:302021-08-01T04:27:01+5:30
गोंदिया : महाराष्ट्रामध्ये इग्नू (इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ) यांचा 'ज्योतिषशास्त्र' हा विषय सुरू करू नये, यासंदर्भात अखिल भारतीय ...
गोंदिया : महाराष्ट्रामध्ये इग्नू (इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ) यांचा 'ज्योतिषशास्त्र' हा विषय सुरू करू नये, यासंदर्भात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गोंदियातर्फे उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्राला संतांची आणि समाज सुधारकांची शेकडो वर्षाची परंपरा लाभली आहे. आपल्या भूमीचा 'बुद्धीच्या देशा' असा उल्लेख केला जातो. संत चक्रधर स्वामीपासून ते थेट संत गाडगे महाराजापर्यंत प्रबोधनाची परंपरा आहे. दुसऱ्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले पासून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते प्रबोधनकार ठाकरेपर्यंत समाज सुधारक होऊन गेलेत. त्यांची परंपरा चालू ठेवणे, हे प्रत्येक महाराष्ट्रातील सुज्ञ युवकाचे कर्तव्य आहे. अशावेळी इग्नू तर्फे यंदाच्या वर्षापासून ज्योतिषशास्त्र या विषयात पदवी आणि पदविका हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. खगोल शास्त्रज्ञ ज्योतिषाला मान्यता देत नाहीत. ज्योतिषाचा अभ्यासक्रम सुरू करणे म्हणजे लोकांना अंधश्रद्धेच्या दरीत लोटण्यासारखे आहे. स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ही ज्योतिषशास्त्राला कडाडून विरोध केला आहे. ज्योतिषशास्त्र हा अभ्यासक्रम शिकून महाराष्ट्रामध्ये कर्मकांड करणारे आणि आपला वेळ पैसा आणि श्रम वाया घालविणारे तरुण, युवक तयार होतील. समाज विज्ञानाच्या दिशेने जाण्याऐवजी अज्ञानाच्या दिशेने ढकलला जाईल. हे थांबवण्यासाठी इग्नूच्या 'ज्योतिषशास्त्र' या अभ्यासक्रमाला मान्यता देऊ नये म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा गोंदियातर्फे संघटक डॉ. प्रकाश धोटे, सचिव यशवंत कावळे, कोषाध्यक्ष अमर वराडे, सदस्य अमित धावडे, मनोज गणवीर, चंद्रकांत हटवार यांनी उपजिल्हाधिकारी यांचेमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले.