डोन्ट वरी ... कोरोना जिल्ह्यातून परतीच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:27 AM2021-01-18T04:27:04+5:302021-01-18T04:27:04+5:30
गोंदिया : गेले वर्षभर कहर करुन जिल्हावासीयांना त्रस्त करून सोडलेल्या कोरोनाने आता जिल्ह्यातून परतीची वाट धरली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा ...
गोंदिया : गेले वर्षभर कहर करुन जिल्हावासीयांना त्रस्त करून सोडलेल्या कोरोनाने आता जिल्ह्यातून परतीची वाट धरली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू पूर्णपणे कमी होत आहे. बाधित रुग्णांपेक्षा मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ १८६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, जिल्ह्यातून कोरोना परतीच्या वाटेवर असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून कोरोनाने आता जिल्ह्यातून काढता पाय घेतला आहे. रविवारी (दि.१७) जिल्ह्यात १२ कोरोना बाधितांची नोंद झाली तर, ३४ बाधितांनी कोरोनावर मात केली. १२ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ८, तिरोडा २, गोरेगाव १ बाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६०,१३२ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले असून, यापैकी ४८,६२१ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर रॅपिड ॲन्टिजेन टेस्टअंतर्गत ६२,९०८ जणांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ५६,८६५ जणांचे नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत एकूण १४,०३४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यापैकी १३,६५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत केवळ १८६ ॲक्टिव्ह रुग्ण असून, १८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.