त्या पाच गावांमध्ये शिक्षणाची दारे अद्यापही बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:00 AM2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:27+5:30
जिल्हा परिषदेने त्या शाळांसाठी एक एक शिक्षक ही नियुक्त केले होते. म्हणायला तर शाळा सुरु झाल्या परंतु शाळा त्या गावापर्यंत ये-जा करणे मोठी तारेवरची कसरत असल्याने शिक्षकांना दरेकसावरुन पायी प्रवास करुन जावे लागत होते. शिक्षक त्या ठिकाणी एक दोन थांबायचे आणि थोडे शिक्षणाचे धडे देऊन दरेकसा येथे परत यायचे. काही वर्ष असेच चालले. आठ आठ दिवस शिक्षक शाळेत जात नव्हते.
विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : ज्या महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यांनी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची मशाल पेटविण्यासाठी अख्खे आयुष्य समर्पित केले, त्याच महाराष्ट्रात आज २१ व्या शतकात सुद्धा अशी गावे आहेत जिथे शिक्षणाची दारे पुढे सुरु ठेवण्याऐवजी बंद करण्यात आली.या गावामध्ये मुरकुडोह-दंडारी सारख्या आदिवासी गावाचा आहे. मात्र अद्यापही येथे शाळा सुरू न झाल्याने येथील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे बंदच असल्याचे चित्र आहे.
मुरकुडोह-दंडारी परिसरात मुरकुटडोहचे तीन गाव आणि दंडारी टेकाटोला मिळून एकूण पाच गावांचा समावेश आहे. मधात एक दोन छोट्या टोल्यांचा सुद्धा समावेश त्यात असून ही पाच गावे मिळून एकूण दोनशेच्यावर घरांमध्ये जवळपास ३५० कुटुंबांचे वास्तव्य आहे.
अशात या ठिकाणी किमान प्राथमिक शिक्षणाची सोय असणे आवश्यक आहे. दोन दशकापूर्वी शासनाने ‘गाव तिथे शाळा’ ही योजना अंमलात आणली होती.या योजनेअंतर्गत मुरकुटडोह आणि दंडारी या गावांमध्ये सुद्धा एक एक शाळा मंजूर करण्यात आली होती.
जिल्हा परिषदेने त्या शाळांसाठी एक एक शिक्षक ही नियुक्त केले होते. म्हणायला तर शाळा सुरु झाल्या परंतु शाळा त्या गावापर्यंत ये-जा करणे मोठी तारेवरची कसरत असल्याने शिक्षकांना दरेकसावरुन पायी प्रवास करुन जावे लागत होते. शिक्षक त्या ठिकाणी एक दोन थांबायचे आणि थोडे शिक्षणाचे धडे देऊन दरेकसा येथे परत यायचे. काही वर्ष असेच चालले. आठ आठ दिवस शिक्षक शाळेत जात नव्हते.
या गावांमध्ये शिक्षण कसे चालले याची प्रत्यक्ष शहनिशा करण्यासाठी कोणता अधिकारी कधी पोहोचला नाही. नंतर शिक्षकांची संख्या वाढविण्यात आली. मात्र यानंतरही कोणताच शिक्षक नियमित जात नव्हता.एक तर सुदूर डोंगराळ भागात टापूवर असलेले गावावरुन नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्र त्यामुळे या भागात जाणे म्हणजे जीव मुठीत घेवून चालले,असे समजायचे. सालेकसा तालुक्यातील दरेकसा या परिसरात बदली करुन टाकायची यातच एखाद्या शिक्षकाला शिक्षा म्हणून बदली करायची असेल तर त्याला मुरकुटडोह दंडारी पाठवा असाच फरमान निघायचा. यामुळेच तो शिक्षक त्या शाळेत जाण्यासाठी घरुन तर निघायचा परंतु अर्ध्या रस्त्यातूनच परत यायचा. या सर्व प्रकारात सतत येथील विद्यार्थ्यांचे नुकसानच होत गेले. परिणामी येथील शाळा बंदच स्थितीत आहेत.
पटसंख्या नाही म्हणून शाळा बंद
मुरकुडोह-दंडारी येथे कसे बसे प्राथमिक शाळा सुरु असताना तीन वर्षापूर्वी शासनाने आदेश काढून ज्या शाळांमध्ये १० पेक्षा कमी पटसंख्या असेल त्या शाळांना बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे येथील तिन्ही प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या. या पाचही गावातील चिमुकल्यासाठी शिक्षणाची दारे बंद करण्यात आली. मागील तीन वर्षापासून शाळा बंद झाल्या आहेत. त्यामुळे या गावामधील काही मुले आश्रम शाळेत जातात तर उर्वरित मुले-मुली शिक्षणाविना असून त्यांचे भविष्य अंधातरी दिसत आहे.
एक तरी शाळा सुरु करावी
पाचही गावे मिळून किमान एक तरी प्राथमिक शाळा पुन्हा सुरु करावी अशी मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे. नुकतेच गावकऱ्यांनी शिक्षण विभागासह लोकप्रतिनिधी निवेदन देवून प्राथमिक शाळा सुरु करण्याची मागणी केली आहे.