सूर्याटोला मैदान बनला दारूड्यांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:02 AM2019-06-14T00:02:09+5:302019-06-14T00:02:41+5:30
शहरातील सूर्याटोला परिसरातील रावजीभाई समाजवाडी समोरील मैदान सध्या दारूड्यांचा अड्डा बनला आहे. रात्रीला येथे दारूड्यांचे टोळके बसून आपला शौैक पूर्ण करीत आहेत. दररोजच्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील सूर्याटोला परिसरातील रावजीभाई समाजवाडी समोरील मैदान सध्या दारूड्यांचा अड्डा बनला आहे. रात्रीला येथे दारूड्यांचे टोळके बसून आपला शौैक पूर्ण करीत आहेत. दररोजच्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. यावर नागरिकांनी रामनगर पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. मात्र रामनगर पोलिसांकडून यावर काहीच कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. परिणामी, समस्या कायम आहे.
बारमध्ये बसून दारू पिणे हे आता सामान्यांच्या आवाक्यात राहिले नाही. अशात दारूचे शौकीन मोकळी जागा बघून आपले शौक पूर्ण करीत आहेत. असाच काहीसा प्रकार सुर्याटोला परिसरातील रावजीभाई समाजवाडी समोरील मैदानात सुरू आहे. रावजीभाई समाजवाडी समोर मोठे मैदान आहे.
या मैदानावर परिसरातील मुले खेळतात. तर वयस्क व वृद्ध सकाळी-सायंकाळी पायी फिरतात. जेवण झाल्यावर काही जण या मैदानात शतपावली करायचे. मात्र या मैदानावर आता दारूड्यांचे टोळके बसून दारू पित असतात. दारू पिऊन शिवीगाळ व आरडाओरड करण्यासारखे प्रकार घडत असल्याने नागरिकांना आता मैदानात जाणे कठीण झाले आहे. रात्री ८.३० वाजतानंतर रस्ताने वाहतूक कमी होताच दारुडे मैदानात आपला तळ ठोकून दारू पित बसतात.
यावेळी त्यांची आपसांत वादावादी व शिवीगाळ ही होत असल्याने परिसरातील नागरिक विशेषत: महिलांना रस्त्यावरून ये-जा करणेही कठीण होत आहे.
परिसरातील नागरिकांनी हा प्रकार बंद व्हावा यासाठी रामनगर पोलिसांत लेखी तक्रार दिली. मात्र पोलिसांकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.
कित्येक नागरिक झाले जखमी
मैदानात दारूडे दारू पिवून झाल्यावर दारूच्या बॉटल्स तेथेच फोडत असल्याने मैदानात सर्वत्र काचेचे तुकडे पसरले आहेत.यामुळे मैदानात खेळणाऱ्या मुलांसह नागरिकांनाही काचांमुळे जखम झाली आहे. सध्या उन्हाळ््याच्या सुट्या सुरू आहेत. अशात परिसरातील लहान मुले मैदानात खेळायला जातात मात्र काचांच्या तुकड्यांमुळे काहींच्या पायाला काचामुळे जखमी झाली आहे. परिणामी पालक मुलांना मैदानात पाठविण्यात घाबरत आहेत. शिवाय पायी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाही काचांमुळे त्रास झाला आहे.
दारुड्यांवर कारवाईकडे दुर्लक्ष
मोकळी व सुनसान जागा बघून तेथेच आपले शौक पूर्ण करण्याचे प्रकार शहरात सर्वत्रच सुरू आहेत. बारमध्ये बसून दारू पिण्यासाठी जास्त पैसे लागतात. अशात कमी पैशांत आपला शौक पूर्ण करण्यासाठी शौकांनानी असे मैदान व सुनसान रस्ते आपले अड्डे बनविले आहेत. सुर्याटोला मैदानच काय शहरातील प्रत्येकच मैदान, बायपास व रिंगरोड सध्या दारूड्यांचे अड्डे बनले आहेत. अंधार पडताच शौकीन आपले शौक पूर्ण करण्यासाठी जमत असल्याचेही दिसत आहे. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष आहे.परिणामी,या शौकिनांना कुणाचाही धाक उरलेला नाही.