दतोरा झाले जलसमृद्ध गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:00 PM2017-09-18T22:00:47+5:302017-09-18T22:01:12+5:30
मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देणारे दतोरा गाव यावर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत फीडर कॅनलच्या बांधकामामुळे जलसमृद्ध झाले आहे.
देवानंद शहारे । लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देणारे दतोरा गाव यावर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत फीडर कॅनलच्या बांधकामामुळे जलसमृद्ध झाले आहे. त्यामुळे दरवर्षी निर्माण होणाºया पाणी टंचाईच्या समस्येवर पूर्णपणे मात करण्यास यश आले आहे.
सन २०१६-१७ च्या जलयुक्त शिवार अभियानाच्या नियोजनात गोंदिया तालुक्यातील १० गावांचा समावेश करण्यात आला होता. यात दतोरा गावाचा समावेश आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या पुढाकाराने करण्यात आला होता. या गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. गावाच्या मध्यभागी असलेला माजी मालगुजारी तलाव ब्रिटिश काळापासून पाण्याचे मुख्य स्त्रोत आहे.
परंतु मागील १५ ते २० वर्षांत या तलावाच्या जलआवक क्षेत्रात निवासी क्षेत्र निर्माण झाल्याने व सिमेंट-काँक्रिटचे उंच रस्ते तयार केल्याने तलावात येणारा प्रवाह बंद झाला. परिणामी उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या दरवर्षी निर्माण होत होती. पाणी टंचाईच्या समस्येमुळे गावकºयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत होती.
हे गाव जलसमृध्द करण्याचा संकल्प जिल्हा परिषद लघु सिंचन उपविभाग गोंदियाचे उपविभागीय अभियंता रमेश चौधरी व शाखा अभियंता वासुदेव रामटेककर यांनी गावकºयांच्या सहकार्याने केला. परिसरातील सर्व नैसर्गिक प्रवाहाचे सर्वेक्षण केले.
यासाठी तत्कालीन कार्यकारी अभियंता पथाडे, अभियंता विश्वकर्मा यांनी देखील सहकार्य केले. गावापासून १ किमी अंतरावर असलेल्या नवीन तलावाचे, तलाव भरल्यावर सलंगापासून नाल्यास वाहणारे अधिकचे प्रवाह मोडून गावातील तलावात आणल्यास गावास जलयुक्त बनविता येईल, त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होईल. असे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर त्या दृष्टीने कामास सुरूवात करण्यात आली. यासाठी एकूण ७०० मीटर लांब फीडर चॅनल प्रस्तावित करण्यात आले.सदर कामावर १९.५७ लाख रूपये अंदाजे खर्च लागणार होते. या कामात ५३५ मीटर लांबीचा खुला कालवा व १६५ मीटर लांब भूमिगत पाईप लाईनचा समावेश होता. प्रवाहास वळण देण्याकरिता तलावाच्या सलंगावर काँक्रिटची भिंत बांधण्यात आली. १७ लाख ४१ हजार रूपयांच्या खर्चात अतिशय अवघड प्रकाराचे हे काम ३ महिन्यातच पूर्ण करण्यात आले.
१५ वर्षात प्रथमच भरला तलाव
यावर्षी सरासरी पेक्षाही बराच कमी पाऊस पडला. तरीही मागील २८ आॅगस्टला रात्री झालेल्या दमदार पावसामुळे नवीन तलाव पूर्ण भरून अधिकचे पाणी वळण होवून गावामधील तलावात भरणे सुरू झाले. त्यामुळे मागील १५ वर्षात कधी न भरलेल्या तलावात सध्या पूर्ण क्षमतेपर्यंत पाणी संग्रहीत झाले. तलावात पाणी साचल्याने भूजल पातळीत वाढ झाली असून पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाली.
लोकप्रतिनिधी आणि गावकºयांचे सहकार्य
दत्तोरा येथे जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कामे करण्यासाठी आणि या गावाची अभियानात निवड करण्यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले. माजी सरपंच धनलाल कावळे, सूरजलाल महारवाडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश मेंढे, मेघराज महारवाडे, दिनेश उके व गावकरी मंडळीने जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागाचे आभार व्यक्त केले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे मागील १५ वर्षांत कधीही न भरलेला तलाव यावर्षी दुष्काळी परिस्थिती असतानाही भरला. त्यामुळे दत्तोरा गाव जलयुक्त झाले व गावातील पाणी टंचाईचे कायमचे निर्मूलन झाले आहे.
-रोशन पाथोडे,
सरपंच, दतोरा.