इमारत बांधकाम प्रकरणी मुकाअंचीच भूमिका संशयास्पद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:43+5:302021-08-01T04:26:43+5:30
गोंदिया : तालुक्यातील ग्राम दवनीवाडा येथील बांधकाम प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचारी दोषी आढळूनही त्यांच्यावर कारवाई करण्यास जिल्हा परिषदेचे ...
गोंदिया : तालुक्यातील ग्राम दवनीवाडा येथील बांधकाम प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचारी दोषी आढळूनही त्यांच्यावर कारवाई करण्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे हेतुपुरस्सर टाळाटाळ असल्याचा आरोप असून याप्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांना दिलेल्या निवेदनातून आ. परिणय फुके, माजी आमदार भेरसिंग नागपुरे, भाजप किसान आघाडी जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी केली आहे.
तालुक्यातील ग्राम दवनीवाडा येथे सभागृह नियमबाह्यपणे भाड्यावर देण्याची तक्रार करण्यात आली होती. शासनाच्या विविध योजना तसेच १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेत बांधकाम तसेच शाळा आवार भिंत बांधकाम करण्यात आले. मात्र सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांसह बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य काम केल्याची तक्रार करण्यात आली. तक्रारीच्या आधारे केलेल्या चौकशीत त्यांच्यावर नियमबाह्यपणे काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांनी कोणतीच कारवाई न करता अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. या प्रकरणी त्वरित योग्य ती कारवाई करण्यासंबंधात विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. शिष्टमंडळात भाजपचे माजी आमदार भेरसिंग नागपुरे, भाजप किसान आघाडी जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांचा समावेश होता.