डॉ. आंबेडकर हे व्यक्ती नसून विचार आहेत
By Admin | Published: November 27, 2015 01:58 AM2015-11-27T01:58:00+5:302015-11-27T01:58:00+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील एक आदर्श राज्यघटना देशासाठी लिहिली. सर्व समाजातील लोक पुढे यावे यासाठी विविध कलमांचा समावेश राज्यघटनेत केला.
सविता बेदरकर : जिल्ह्यात ठिकठिकाणी संविधान प्रास्ताविकेचे वाचन
गोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील एक आदर्श राज्यघटना देशासाठी लिहिली. सर्व समाजातील लोक पुढे यावे यासाठी विविध कलमांचा समावेश राज्यघटनेत केला. बाबासाहेबांनी दूरदृष्टीने लिहिलेल्या या राज्यघटनेमुळे डॉ.बाबासाहेब हे व्यक्ती नसून एक विचारच असल्याचे दिसून येते, असे मत सामाजिक कार्यकर्त्या प्रा.सविता बेदरकर यांनी व्यक्त केले.
संविधान दिनानिमित्त गुरुवारी (दि.२६) सामाजिक न्याय भवनात सहायक आयुक्त, समाज कल्याण आणि जिल्हा ग्रंथपाल अधिकारी यांच्या संयुक्त वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बेदरकर बोलत होत्या. उद्घाटक म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे तर अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त सुनील जाधव, वक्त्या म्हणून प्रा.कविता राजाभोज, जिल्हा ग्रंथपाल अधिकारी खुमेंद्र बोपचे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बेदरकर म्हणाल्या, स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुत्वाचे तत्व राज्यघटनेत आहे. राज्यघटनेने प्रत्येकाचे अधिकारी व स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे. ओबीसी बांधवांच्या कल्याणासाठी डॉ.आंबेडकरांनी कलम ३४० लिहून ठेवले आहे. देशात कुटूंब नियोजनाचा पहिला स्विकार डॉ.आंबेडकरांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. राजाभोज म्हणाल्या, स्वातंत्र्यापूर्वीची राज्यघटना ही चातुर्वण्य पध्दतीवर आधारित होती. डॉ.आंबेडकरांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीयांच्या कल्याणाची राज्यघटना लिहिली. राज्यघटनेतील प्रत्येक कलम हे लोककल्याणाचे आहे. डॉ.आंबेडकरांनी राज्यघटनेतून मानवी मुल्यांची जोपासना केली. संविधान दिनाच्या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांपर्यंत संविधानाची माहिती गेली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उद्घाटक म्हणून बोलताना खडसे म्हणाले, भारतीय राज्यघटना हा आपला एक ऐतिहासिक ठेवा आहे. राज्यघटनेतील प्रत्येक कलम भारतीयांना उज्वल भविष्याकडे नेणारे दीपस्तंभ आहे. बालपणापासून संविधान वाचले व ते समजून घेतले तर चांगले संस्कार घडण्यास मदत होईल. स्वातंत्र्यानंतर देशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक दिशा काय असावी, या प्रश्नाचे उत्तर भारतीय राज्यघटना आहे, असेही ते म्हणाले.
अध्यक्ष म्हणून बोलताना जाधव म्हणाले, एक आदर्श राज्यघटना म्हणून आपल्या राज्यघटनेकडे जग बघते. संविधान अर्थात राज्यघटना कितीही चांगली असली तरी ती चांगल्याप्रकारे राबविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
प्रारंभी पाहुण्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन केले. प्रा. सविता बेदरकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाला विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य, सामाजिक न्याय भवनातील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी तर संचालन समाजकल्याण निरीक्षक अंकुश केदार यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)