डॉ. गौरव बग्गा यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी; ३ किलो २०० ग्रॅम सोने व १.३४ कोटी रोकड जप्त
By नरेश रहिले | Published: October 20, 2023 07:27 PM2023-10-20T19:27:08+5:302023-10-20T19:29:18+5:30
नागपूरच्या आर्थीक गुन्हे शाखेच्या आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज (दि. २०) सकाळी ८ वाजतापासून गोंदियात कारवाईला सुरूवात केली.
गोंदिया: येथील डायमंड एक्सचेंज गेमींग अप्लीकेशनच्या मार्फत लोकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा सट्टाकिंग सोंटू नवतरन जैन याने आपल्या तिजोरीतील रक्कम आपल्या मित्र मंडळी व ओळखीच्या लोकांकडे सोडल्याने सोंटूचा मित्र डॉ. गौरव बग्गा यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेने छापे घालून एक कोटी ३४ लाख रूपये रोख व ३ किलो २०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात डॉ. गौरव बग्गा यांना ताब्यात घेऊन नागपूरला एक वाहन रवाना झाले.
नागपूरच्या आर्थीक गुन्हे शाखेच्या आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज (दि. २०) सकाळी ८ वाजतापासून गोंदियात कारवाईला सुरूवात केली. सोंटू जैन यांचा मित्र डॉ. गौरव बग्गा यांच्याकडे कोट्यवधी रूपये व सोने ठेवले होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घालून १ कोटी ३४ लाख रूपये रोख व ३ किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत.
ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सोंटूने नागपुरातील व्यापाऱ्याला ५८ कोटींचा गंडा घातला. व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच सोंटू दुबईला पसार झाला. २२ जुलैला पोलिसांनी सोंटूच्या गोंदियातील निवासस्थानी छापा टाकून १७ कोटींची रोख, १४ किलो सोने व २९४ किलो चांदी जप्त केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या चार बैंक लॉकरची झडती घेतली. लॉकरमधूनही पोलिसांनी ८५ लाख व साडेचार कोटींचे सोने जप्त केले. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर सोंटूने वकिलामार्फत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतला. उच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर सोंटूने सर्वोच्च न्यायालयान जामिनासाठी अर्ज दाखल केला. ९ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन फेटाळत सात दिवसांत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन नाकारल्यानंतर त्याच्यासमोर हाच पर्याय शिल्लक राहिला होता. १६ ऑक्टोबरला त्याने प्रथम श्रेणी कनिष्ठ न्यायालयासमोर शरणागती पत्करली. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आर्थीक गुन्हे शाखा नागपूर यांनी धाडसत्र चालवून डॉ. गौरव बग्गा यांच्या घरची झडती दिवसभर करून डॉ, गौरव बग्गा यांना ताब्यात घेतले आहे. त्याला नागपूरला नेण्यााठी आर्थीक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी खासगी वाहन बालावून त्याला नागपूरला नेले.
बॅंकेच्या मॅनेजरची चौकशी सुरूच
गोंदियातील एक्सीस बॅंकेचा मॅनेजर असलेल्या अंकेश खंडेलवाल याच्या घराचीही झडती घेण्यात आली. परंतु त्याच्या घरी काही सापले नाही. परिणामी तो काम करीत असलेल्या एक्सीस बॅंकेत घेऊन आले. आर्थीक गुन्हे शाखेचे अधिकारी त्यांची कसून चौकशी करीत आहेत.
डॉ. गौरव बग्गा गंगाबाई रूग्णालयात डॉक्टर
गोंदियातील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात रेडीओलॉजीस्ट म्हणून कार्यरत डॉ. गौरव बग्गा यांच्या घरी आर्थीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घालून सट्टाकिंग सोंटू जैन याच्याशी त्याचे धागेदोरे असल्याचे पुढे आले आहे. सोंटूच्या माहितीवरूनच डॉ. गौरव बग्गा याच्या घरी धाड घालण्यात आली आहे.