पाईपलाईन शेतातून नव्हे, तर गावातून टाका ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:28 AM2021-03-05T04:28:50+5:302021-03-05T04:28:50+5:30
सुकडी डाकराम : धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प टप्पा-२ चे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. या योजनेची पाइपलाईन शेतातून न नेता ...
सुकडी डाकराम : धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प टप्पा-२ चे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. या योजनेची पाइपलाईन शेतातून न नेता गावातून न्यावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ही बाब उपविभागीय अधिकाऱ्यांना मान्य आहे. मात्र, धापेवाडा प्रकल्पाचे सहायक अभियंते शेतातूनच पाईपलाईन नेण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे पाईपलाईन टाकण्याच्या कामात खाेडा निर्माण झाला आहे.
तिरोडा तालुक्यातील बोदलकसा, चोरखमारा या दोन तलावांमध्ये पाणी घालण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. बोदलकसा व चोरखमारा या दोन्ही तलावांमध्ये पाणी टाकण्यासाठी पाईपलाईनचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. केवळ १० टक्के काम शिल्लक असून, सध्या ते सुरू आहे. बोदलकसा तलावात पाणी टाकण्यासाठी जी पाईपलाईन टाकली जात असून, सुकडी-डाकराम व पिंडकेपार येथे काम सुरू आहे. या तलावात पाणी टाकण्यासाठी सर्वप्रथम सुकडी-डाकराम येथे सर्वेक्षण झाले होते. तसा प्रस्तावही संबंधित विभागाने मंजूर केला होता; पण आता पाईपलाईनचे काम सुकडी-डाकराम गावातून करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आपल्या शेतातून पाईपलाईन जाऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. २५ फेब्रुवारी रोजी उपविभागीय कार्यालय तिरोडा येथे सुकडी-डाकराम येथील शेतकऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यात आपल्या शेतातून पाईपलाईन जाऊ देणार नाही, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी नाष्टे यांनीसुध्दा शेतकऱ्यांच्या भूमिकेचे समर्थन केले होते; तर शेतातून पाईपलाईन न टाकता सरळ रस्त्याने पाईपलाईन टाकण्यास सांगितले होते. मात्र यानंतरही या प्रकल्पाचे अभियंते ही बाब मान्य करण्यास तयार नसल्याने यावरून शेतकरी आणि अभियंते यांच्यात वाद निर्माण झाला आहे.
..........
मोक्यावर जाऊन केली पाहणी
उपविभागीय अधिकारी नष्टे यांनी सुकडी डाकराम येथे येऊन मोक्यावर जागा पाहणी केली. त्यात गावातून पाईपलाईन जायला हवी, असे सांगितले. मात्र धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे सहायक अभियंते भलावी, देशमुख, औस्कर यांनी गावातून पाईपलाईन टाकण्यास विरोध केला आहे. गावातून पाईपलाईन टाकल्यास विविध अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याचे सांगितले.
......
गावकरी म्हणतात, कसलीच अडचण नाही
पाईपलाईन टाकण्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी सर्व पदाधिकारीसुध्दा उपस्थित हाेते. सरपंच जयश्री गभणे, उपसरपंच नीलेश बावणथडे, माजी पोलीस पाटील शिवचरण बोरकर, रामचंद्र गभणे, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद दखणे, सुभाष कुर्वे, ग्रामसेविका कटरे, देवा शेनेकार, राजकुमार बोरकर, ललित सूर्यवंशी, तलाठी क्षीरसागर व गावकरी उपस्थित होते. गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता ८० मीटरचा आहे. यामुळे यात १२ फूट पाईपलाईन टाकण्याचे काम करणे शक्य असल्याचे सांगितले. त्यामुळे या कामात कसलीच अडचण येणार नसल्याचे सांगितले.