नाली, रस्त्याचे बांधकाम कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:09 AM2017-11-22T00:09:53+5:302017-11-22T00:10:03+5:30
तिरोडा नगर परिषद अंतर्गत येणाºया लोधीटोला येथे नाली व रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम न करता कागदावरच बांधकाम झाल्याचे दाखवून दोन लाख रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार माहितीच्या अधिकारातंर्गत उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा नगर परिषद अंतर्गत येणाºया लोधीटोला येथे नाली व रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम न करता कागदावरच बांधकाम झाल्याचे दाखवून दोन लाख रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार माहितीच्या अधिकारातंर्गत उघडकीस आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, झनकलाल लिल्हारे व नोकलाल लिल्हारे यांनी माहितीच्या अधिकारातंर्गत या बांधकामाची माहिती मागविल्यानंतर हा प्रकार उघकीस आला. त्यांनी जनमाहिती अधिकारी न.प. तिरोडा यांना २८ सप्टेंबर २०१६ रोजी प्रपत्र अ नुसार माहिती मागितली. मात्र सदर माहिती न मिळाल्याने ३० दिवसांनंतर प्रथम अपिलीय अधिकारी न.प. तिरोडा यांना जोडपत्र ब नुसार माहिती मागितली. परंतु त्यांनीसुद्धा माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने अर्जदारांना संशय आला. त्यामुळे त्यांनी २० जानेवारी २०१७ ला जोडपत्र क भरून महाराष्टÑ राज्य माहिती आयुक्त नागपूर येथे अपिल केले. ७ जुलै २०१७ रोजी सुनावनी झाली. त्यात माहिती आयुक्तांनी १५ दिवसांच्या आत माहिती देण्याचे आदेश प्रथम अपिलीय अधिकाºयांना (मुख्याधिकारी न.प. तिरोडा) यांना दिले. २० जुलै २०१७ रोजी जनमाहिती अधिकारी बांधकाम विभाग न.प.तिरोडा यांनी अर्जदारांना माहिती दिली. न.प.अवंतीबाई प्राथमिक शाळा ते गोपी नागपुरे यांच्या घरापर्यंत बांधलेला सिमेंट रस्ता व त्याची किंमत किती, याची माहिती अर्जदारांनी मागविली होती. माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीत, सदर सिमेंट रस्ता वर्क आॅर्डरनुसार (एनपीटी/ पीडब्ल्यूडी/२२/२०१६ दि.१ जून २०१६) कंत्राटदाराने बांधलेला असून किंमत दोन लाख ९९ हजार ०६७ रूपये आहे. १५ जुलै २०१६ रोजी बांधकाम पूर्ण, रस्त्याची लांबी ९० मीटर असल्याचे नमूद आहे. शिवाय नियमानुसार कामाची रक्कम ७ जुलै २०१७ रोजी एक लाख १४ हजार ५०३ रूपये व उरलेली रक्कम एक लाख २४ हजार ४९४ रूपये अशी एकूण रक्कम दोन लाख ३८ हजार ९९७ रूपये दिल्याचे त्यात नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात सदर सिमेंट रस्त्याचे बांधकामच न झाल्याने अर्जदाराने मुख्याधिकारी यांच्याकडे त्याची तक्रार केली. यावर अभियंता न.प. तिरोडा यांनी मोक्यावर जावून चौकशी करुन अहवाल दिला. त्यात पश्चिम भागाकडील अवंतीबाई प्राथमिक शाळा ते गोपी नागपुरे यांच्या घरापर्यंत रस्ता तयारच करण्यात आला नाही. तसेच सदर रस्त्याची पाहणी केली असता सदर जागेवर सिमेंट रस्ता नसल्याचे आढळले. जोडपत्र अ नुसार (विषय-२) हनुमान मंदिर ते मुरली बहेटवार यांच्या घरासमोरील रस्त्यापर्यंत नाली बांधकाम व त्याची किंमत २० जुलै २०१७ च्या पत्रात देण्यात आली नाही. परंतु दुसरीच माहिती देण्यात आली. त्यात कैलाश लिल्हारे ते हनुमान मंदिरापर्यंत नाली आदेशानुसार रक्कम दोन लाख ९६ हजार ५४३ रूपये, लांबी ६९ मीटर व १ नोव्हेंबर २०१६ रोजी काम पूर्ण झाल्याचे नमूद आहे. परंतु सदर नाली सात-आठ वर्षांपूर्वीच तयार केलेली आहे. नवीन बांधकाम झालेले नाही, असे न.प. अभियंता यांनी मौका चौकशी करून अहवाल दिला. या दोन्ही प्रकरणांत बांधकाम न करता नगर परिषद तिरोडाकडून संबंधित कंत्राटदार, अधिकारी व पदाधिकारी यांनी रक्कम उचल केलेली आहे. या व्यवहारात प्रचंड आर्थिक घोळ झाल्याची बाब माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहिती उघडकीस आली आहे.
बांधकाम अर्धवट मात्र पूर्ण रकमेची उचल
जोडपत्र अ नुसार विषय-३ मध्ये मल्हुजी लिल्हारे ते निरूबाई बाभरे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम व त्याची किमत, जाहिरात व एमबीची झेरॉक्स मागविण्यात आली. यात न.प. तिरोडाने २२ सप्टेंबर २०१५ रोजी आदेश, रक्कम दोन लाख ८९ हजार १२२ रूपये व १८ आॅक्टोबर २०१५ रोजी ९२ मीटर लांब नालीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे नमूद आहे. कंत्राटदाराला कपात करून दोन लाख ३३ हजार ७०१ रूपये देण्यात आले. मात्र अर्जदाराच्या तक्रारीनुसार, न.प. अभियंत्याने मौका चौकशी केली. त्यात ९२ मीटर नाली बांधकामापैकी केवळ २० फूट नालीचे बांधकाम झाल्याचा अहवाल दिला. त्यामुळे याही प्रकरणात मोठाच घोळ करण्यात आल्याचे उघड झाले आहे.