गटारे देत आहेत अपघाताला आमंत्रण
By admin | Published: August 26, 2014 11:32 PM2014-08-26T23:32:54+5:302014-08-26T23:32:54+5:30
शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्याकरिता नगर प्रशासनाच्या वतीने गटारे व नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र बहुतेक गटारांवरील झाकणे गायब असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची
गोंदिया : शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्याकरिता नगर प्रशासनाच्या वतीने गटारे व नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र बहुतेक गटारांवरील झाकणे गायब असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील नाल्यांमध्ये केरकचरा रस्त्यांवर पडलेला आहे. मात्र या कचऱ्याचे देखील अद्यापही विल्हेवाट लावण्यात आली नाही. त्यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र त्या तुलनेत शहरातील विकास कामे होत नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहे.
शहरात ठिकठिकाणी सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या नाल्यांची नियमितपणे साफसफाई केली जात नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही मुख्य मार्गावर गटारे असून त्यावरील छाकणे गायब झाली असल्याने या गटारांमध्ये पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर गटारांवर झाकणे लावण्यात यावी तसेच नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांच्या वतीने नगर परिषदेकडे करण्यात आली होती. मात्र न.प.चे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
नाल्यांचा उपसा झाला नसल्याने नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यांवर व नागरिकांच्या घरात शिरत आहे. यामुळे विविध साथरोगांची देखील लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, शहरातील काही वॉर्डात येण्याजाण्याच्या मार्गावर मोठी मोठी गटारे तयार झाली असल्याने नागरिकांना ये-जा करताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर मुख्य मार्गावर खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.
सदर समस्या मार्गी लावण्याकरिता न.प.कडून विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये न.प. प्रशासनाप्रती रोष व्याप्त आहे.
(शहर प्रतिनिधी)