दीड महिन्यापासून पेयजल समस्या
By admin | Published: May 6, 2016 01:29 AM2016-05-06T01:29:07+5:302016-05-06T01:29:07+5:30
येथील अनेक वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. काही भागात तर अनेक दिवसांपासून नळांना पाणीच येत नाही.
तिरोड्यात पाणी पेटले : आमदार, मुख्याधिकारी व अभियंत्यांना निवेदन
तिरोडा : येथील अनेक वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. काही भागात तर अनेक दिवसांपासून नळांना पाणीच येत नाही. बोअरवेल्ससुद्धा आटल्या आहेत. त्यामुळे तिरोडावासीयांचे घसे तहानेने व्याकुळ झाले असून त्वरित नळांद्वारे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करा, अशी मागणी महिलांनी पाणी पुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्यांना निवेदनातून केली आहे.
डॉ.झाकीर हुसेन वॉर्ड, सी.जे. पटेल कॉलेज परिसर या भागात मागील दीड महिन्यांपासून नळांना पाणीच येत नाही. नळांतून फक्त हवा निघते. मग पाण्याचे बिल तुम्ही हवेसाठी देता का? असा सवाल वार्डातील महिलांनी केला आहे. शिवाय पाणी पुरवठा विभागात वारंवार फोनद्वारे सूचना देवूनही सुधारणा करणे तर दूर साधी चौकशी करण्यासाठी कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी येत नाही. नळांना पाणी येत नसल्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या घरून पाणी आणावे लागते. परंतु त्यांच्या विहिरीसुद्धा आता आटण्याच्या मार्गावर असल्यामुळे तेसुद्धा आता पाणी घेवू देत नाही.
नळांना पाणी येत नसतानाही पाण्याचे बिल मात्र दर महिन्याला जेवढेच्या तेवढेच येते. त्यामुळे एप्रिल २०१६ चे पाण्याचे बिल आम्ही भरणार नाही, असा पावित्रा डॉ. झाकीर हुसेन वार्डातील महिलांनी घेतला आहे.
प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होते. परंतु संबंधित विभागाच्या वतीने कसलीही स्थायी उपाययोजना करण्यात आली नाही. दरवर्षी उद्भवणारा पाण्याचा प्रश्न कुधी सुटेल? असा सवाल महिला करीत आहेत. डॉ. झाकीर हुसेन वार्ड व सी.जे. पटेल कॉलेज परिसरात वर्षभर प्रेशर राहत नाही. नागरिक फोन करून पाण्याची समस्या सांगतात. मात्र एका भागात भरपूर पाणी तर दुसऱ्या भागात एक थेंबसुद्धा पिण्याचे पाणी नाही, ही तिरोडा शहराची स्थिती आहे.
टँकरची सोय करा
या प्रकाराबाबत तिरोडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनाही निवेदन देवून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आमदार विजय रहांगडाले यांच्या कार्यालयात निवेदन देवून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी लक्ष देण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. ही समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी रविशंकर राऊत, शितल राऊत, निलकांता राऊत, प्रज्वल राऊत, ज्योती साखरे, प्रीती नंदागवळी, स्वीनल नंदागळवी, निलिमा सूर्यवंश्ी, मीरा मेश्राम, देवका कोचे, दिनेश राऊत आदी अनेक महिला-पुरूषांनी केली आहे.