शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट
By admin | Published: April 5, 2017 12:59 AM2017-04-05T00:59:11+5:302017-04-05T00:59:11+5:30
जिल्हावासीयांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींच्या अफाट प्रयत्नामुळे गोंदियाला मेडीकल कॉलेज मंजूर करविण्यात आले.
रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय :अधिष्ठात्यांची अशीही उदासीनता
गोंदिया : जिल्हावासीयांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींच्या अफाट प्रयत्नामुळे गोंदियाला मेडीकल कॉलेज मंजूर करविण्यात आले. परंतु मेडिकल कॉलेज सुरु झाल्यापासून येथील अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्या ढिम्म प्रशासनामुळे रुग्ण व नातेवाईकांचे हाल होत आहेत.
यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सूर्य आग ओकत असताना रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय येथे उपलब्ध नाही. बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय या मेडीकल कॉलेजमध्ये विलीन झाले. जिल्हा सामान्य रुग्णालय असताना रुग्णांची पुरेपुर काळजी घेतली जायची. परंतु आता मेडिकल कॉलेज सुरु झाल्यामुळे चांगली रुग्णसेवा मिळण्याची अपेक्षा होती. परंतु रुग्ण सेवेबाबत येथे उलटी गंगा वाहत आहे. या मेडीकल कॉलेजमध्ये साधे पिण्याचे पाणी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मिळत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना गोंदिया शहरातील एखाद्या नातेवाईकाडून किंवा एखाद्या हॉटेलातून आणावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी मेडीकल कॉलेजमधील रुग्णांच्या नातेवाईकांना रस्ता ओलांडून बाहेर पडावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा अपघातही घडू शकतो. या मेडिकल कॉलेजमध्ये अशा एक ना अनेक समस्या भेडसावत आहेत.