चालक, वाहक म्हणतात मुंबईची ड्यूटी नको रे बाबा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 05:00 AM2021-04-03T05:00:00+5:302021-04-03T05:00:19+5:30
आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने मुंबई कार्यालयातून चालक- वाहकांना मुंबईला पाठविण्याचा आदेश निघणार असल्याची माहिती आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक चालक- वाहकांनी या बेस्टबस सेवेबद्दल चिंता व्यक्त केली असून, अनेक जण नापसंती दर्शवत आहेत. अजून प्रत्यक्षात गोंदिया आगाराला आदेश प्राप्त झाला नाही. मात्र, असा आदेश लवकरच मिळणार असल्याची माहिती आहे. मुंबई येथील आदेश निघणार असल्याच्या माहितीने कर्मचारी संघटनेमध्ये चर्चा सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई येथील बेस्टसेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या विविध विभागांतील चालक- वाहकांना मुंबई बेस्टसेवेसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील अनेक चालक- वाहक मुंबईची ड्यूटी नको रे बाबा, असे म्हणत नकार देत आहेत.
सुदैवाने गोंदिया आगारातील एकाही चालक, वाहकाची गतवर्षी मुंबई येथील बेस्ट बससेवेसाठी ड्यूटी लागली नव्हती. राज्यातील महामंडळाच्या इतर विभागांतील पुणे, सातारा, कोल्हापूर, धुळे, नांदेड, लातूर, जालना, तसेच विदर्भातील अमरावती, अकोला असे इतर जिल्ह्यांतील अनेक चालक- वाहकांची मुंबई बेस्टसेवेसाठी ड्यूटी लागली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने मुंबई कार्यालयातून चालक- वाहकांना मुंबईला पाठविण्याचा आदेश निघणार असल्याची माहिती आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक चालक- वाहकांनी या बेस्टबस सेवेबद्दल चिंता व्यक्त केली असून, अनेक जण नापसंती दर्शवत आहेत. अजून प्रत्यक्षात गोंदिया आगाराला आदेश प्राप्त झाला नाही. मात्र, असा आदेश लवकरच मिळणार असल्याची माहिती आहे. मुंबई येथील आदेश निघणार असल्याच्या माहितीने कर्मचारी संघटनेमध्ये चर्चा सुरू आहे. आजही एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह शासनाच्या इतर सुविधा मिळत नसल्याने कर्मचारी संतप्त आहेत. त्यातच शासनाने मुंबई येथील बससेवेसाठी कर्मचाऱ्यांना पाठविण्याचा आदेश दिल्यास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारीही शासनाने घेण्याची गरज आहे. यासोबतच चालक, वाहकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यानंतरही कर्मचारी मात्र मुंबईचे नाव ऐकताच नाहीच म्हणत आहेत.
यावर्षी अद्यापतरी कर्मचाऱ्यांना पाठविण्याचे आदेश नाही
परराज्यातील मजुरांना सोडताना झाला होता त्रास
मुंबईला कर्तव्यासाठी गेल्यावर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे अनेक जण मुंबईची ड्यूटी नको रे बाबा, असे म्हणू लागले आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यांतील ज्या एसटीच्या चालक- वाहकांनी मुंबईला बेस्टसेवेसाठी कर्तव्य निभावले त्यातील अनेकांना कोरोनाने ग्रासले होते. आजही त्यांचे कुटुंबीय मदतीपासून वंचित असल्याची माहिती आहे.
सुदैवाने जिल्ह्यातील एकाचीही मुंबईला ड्यूटी लागलीच नाही
मागील लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील अनेक चालक- वाहकांनी स्थलांतरित परराज्यातील मजुरांना सोडण्यासाठी कर्तव्य निभावले होते. यावेळी त्यांना पिण्याच्या पाण्यापासून घरी पोहोचेपर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. मात्र, सुदैवाने जिल्ह्यातील एकाही चालक- वाहकाला मुंबई येथील बेस्टसेवेसाठी कर्तव्य निभावण्यासाठी जावेच लागले नसल्याने कर्मचारी निश्चिंत होते. मात्र, आता पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडून विविध विभागांतील चालक- वाहकांची नावे मागविण्यात येत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा चिंता सतावू लागली आहे.
चालक-वाहकांच्या प्रतिक्रिया
एकीकडे सरकार मुंबईला कर्तव्यासाठी बोलावत आहे; पण दुसरीकडे त्याच चालक- वाहकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांची जबाबदारी एसटी किंवा शासन घेत नाही. शिवाय मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईही मिळत नसल्याने शासनाने चालक- वाहकांचा विचार करण्याची गरज आहे.
- वाहक, गोंदिया आगार
गतवर्षी कोरोनाकाळात इतर राज्यांतील मजुरांना सोडण्याचे कर्तव्य निभावले. सुदैवाने मुंबईला जावे लागले नाही. मात्र, आता वय वाढत चालल्याने कोरोनाच्या संसर्गाची भीती वाटत आहे. ५० व यापुढील कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवू नये, अशी आमची चालक- वाहक संघटनेची शासनाकडे मागणी आहे.
-चालक, गोंदिया आगार