द्रोणाचार्यालाच अंगठा मागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:53 AM2018-02-07T00:53:52+5:302018-02-07T00:54:05+5:30
ढिवर, कहार, कोळी, भोई या जातीतील लोक अशिक्षित, अज्ञानी, गरिबीच्या स्थितीत जीवन जगत आहेत. इतर गर्भश्रीमंत लोक आपल्यावर अन्याय-अत्याचार करतात. त्यामुळे समाजातील लोकांनी जागृत व्हावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खजरी : ढिवर, कहार, कोळी, भोई या जातीतील लोक अशिक्षित, अज्ञानी, गरिबीच्या स्थितीत जीवन जगत आहेत. इतर गर्भश्रीमंत लोक आपल्यावर अन्याय-अत्याचार करतात. त्यामुळे समाजातील लोकांनी जागृत व्हावे. आपले पूर्वज एकलव्य यांनी जसे गुरूदक्षिणा म्हणून अंगठा दिला, तसा अंगठा आता समाज बांधवाने कोणत्याही द्रोणाचार्याला देवू नये. उलट आधुनिक एकलव्य बणून तुम्ही त्याला अंगठा मागा, असे प्रतिपादन संघर्ष वाहिनीचे संयोजक दिनानाथ वाघमारे यांनी केले.
मुंगली-नवेगाव येथे वीर धनुर्धर एकलव्य यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.
सदर पुतळा माजी खा. नाना पटोले यांनी दिला असून तो मूर्तीकार सोनवाने (प्रतापगड) यांनी तयार केला. उद्घाटन किशोर तरोणे यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून मत्स्यजीवी संघ नवी दिल्लीचे माजी संचालक संजय केवट व अतिथी म्हणून मनोहर चंद्रिकापुरे, के.एन. नान्हे, अशोक शेंडे, सरपंच नाजुका कोडापे, उमराव मांढरे, यशवंत दिघोरे, वासुदेव खेडकर, नरले, चाचेरे, उपसरपंच बाबुलाल भैसारे उपस्थित होते.
वाघमारे म्हणाले, संपूर्ण भारतात १७ टक्के लोक सदर समाजातील आहेत. ते अतिशय दारिद्र्यात जीवन जगत आहेत. सरकार कधी जागे होईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
इंजि. केवट आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, भटक्या जाती, विमुक्त जमाती या प्रवर्गांतर्गत अतिशय अज्ञानी, दारिद्र्य भटके जीवन जगणारे लोक असून आम्हाला अनुसूचित जाती-जमातीमध्ये सरकारने समाविष्ट करावे. त्यामुळे या समाजाची आर्थिक उन्नती होईल. मात्र असे न करता सरकारने उलट एनटीचे व्हीजेएनटी, एनटी-बी, एनटी-सी., एनटी-डी असे चार गट करून समाजाचे पाय तोडले. असे गट रद्द करुन सरकारने या समाजाला सामाजिक, राजकीय आरक्षण द्यावे, असे ते म्हणाले.
सकाळी संपूर्ण मुंगली गावात स्वच्छता अभियान व प्रभातफेरी काढण्यात आली. त्यांतर पुतळा अनावरण व महाप्रसाद वितरण करण्यात आले. तर रात्रीला मुलामुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमासाठी नंदलाल कोल्हे, राजू कांबळे, हरिचंद्र कोल्हे, विजय मेश्राम, प्रदीप मेश्राम, मोहन मेश्राम, ईश्वर मेश्राम, श्यामराव ठाकरे, विश्वनाथ मेश्राम, दुधराम कांबळे यांनी सहकार्य केले.