प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा डॉ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 01:02 AM2018-10-11T01:02:19+5:302018-10-11T01:02:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
रावणवडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील दोन तीन महिन्यापासून औषधांचा तुटवडा असल्याने दाखल रुग्णांना बाहेरुन औषध खरेदी करावी लागत आहे. याचा गोरगरीब रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. मात्र आरोग्य विभागाने अद्यापही औषधांचा पुरवठा केला नसल्याने रुग्णांची समस्या कायम आहे.
शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु केले. मात्र जिल्हा आरोग्य विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे. रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील वर्षभरापासून स्थायी वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरोश्यावर काम सुरू आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाह्य रुग्ण तपासणी विभागात दररोज दोनशे ते तिनशे रुग्णांची तपासणी केली जाते. मात्र त्या तुलनेत आरोग्य केंद्रात सोयी सुविधांचा अभाव आहे.
आरोग्य केंद्रात स्वच्छतेचा अभाव असून यामुळे शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका रुग्णाला दुखापत झाली. आरोग्य केंद्रात दाखल होणाºया रुग्णांना डॉक्टर बाहेरुन औषधी खरेदी करुन आणण्यास सांगतात. याचे कारण रुग्णांनी विचारल्यास त्यांना आरोग्य केंद्रात औषधे उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.
तर वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यापासून वंचित राहावे लागते. परिणामी बºयाच रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावा लागत असून याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. येथील लोकप्रनिधी व नागरिकांनी अनेकदा वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचे रिक्त पद भरण्याची मागणी केली. तसेच आरोग्य केंद्रात नियमित औषधांचा पुरवठा करण्यात यावा. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाºयांना निवेदन दिले. मात्र अद्यापही याकडे लक्ष देण्यात आले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे व वेळेवर उपचार होत नसल्याने रुग्णांची ओरड वाढली आहे.
दरम्यान यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाºयाशी संपर्क साधला असता मागील काही दिवसांपासून औषधांचा नियमित पुरवठा होत नसल्याचे सांगितले.