दुष्काळग्रस्त शेतकरी आर्थिक मोबदल्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:45 AM2018-12-16T00:45:16+5:302018-12-16T00:45:38+5:30
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने १३ हजार ५०० ते १८ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई दिल्याचे मोठमोठे फलक लावून भाजपा नेत्यांनी श्रेय लाटले. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात केवळ हेक्टरी १ हजार ते १५०० रुपयांचा मोबदला मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने १३ हजार ५०० ते १८ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई दिल्याचे मोठमोठे फलक लावून भाजपा नेत्यांनी श्रेय लाटले. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात केवळ हेक्टरी १ हजार ते १५०० रुपयांचा मोबदला मिळाला. स्थानिक भाजपा नेते केवळ श्रेयाचे राजकारण करीत असून खोटी माहिती देवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी अद्यापही योग्य आर्थिक मोबदल्यापासून वंचित असल्याचा आरोप आ.गोपालदास अग्रवाल यांनी केला.
तालुक्यातील भाद्याटोला-जिरुटोला रस्ता रुंदीकरण कामाच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.शिक्षण सभापती रमेश अंबुले, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, देवेंद्र मानकर, लोकचंद दंदरे, बबीता देवाधारी, कैलाश देवाधारी, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, झनकसिंग तुरकर, कत्तेलाल मातरे, निर्वतीबाई पाचे, दिलीप तुरकर, कपुरचंद पाचे, रामभगत पाचे, कांतीबाई पाचे, नेतलाल मात्रे, केशव नागफासे, महेश देवाधारी, संजय देवाधारी, बालाराम खैरवार, माणिकचंद तुरकर, श्यामराव तुरकर, धनिराम नागफासे उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, बाघनदी परिसरातील सर्व रस्ते चांगले तयार करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.
रस्त्यांसह या परिसरातील सिंचन, आरोग्य व नागरिकांच्या इतर समस्या मार्गी लावण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. अंबुले म्हणाले विरोधी पक्षातील आमदारांना शासनाकडून निधी खेचून आणणे हे सोपे काम नाही. मा.आ.अग्रवाल यांनी आपले राजकीय वजन वापरून तालुक्याच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. त्यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यात विविध विकास कामे सुरू आहे. तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.