गोंदिया जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:03 PM2020-07-28T12:03:54+5:302020-07-28T12:13:47+5:30
यंदा सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरिपातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वातावरणातील बदलाचा शेतीवर झपाट्याने होत आहे. मागील तीन चार वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. यंदा सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरिपातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधी सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धान लागवडीसाठी अनुकुल मानला जातो. त्यामुळेच जिल्ह्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. यंदा एकूण १ लाख ७७ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. त्यापैकी २७ जुलैपर्यंत ७१ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली असून अजून १ लाख १० हजार हेक्टरवरील रोवणी शिल्लक आहे. जुलै महिना संपत आला तरी अद्यापही पावसाने मागील वर्षीची सुध्दा सरासरी गाठली नाही. परिणामी सुरू असलेल्या धानाच्या रोवण्या देखील पूर्णपण खोळंबल्या आहे. पावसाअभावी रोवण्या लांबत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावित आहे. तर दुसरीकडे ७१ हजार हेक्टरवर केलेल्या रोवण्या सुध्दा पावसाअभावी वाळण्याच्या मार्गावर आला आहे.
रोवणी केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये आतापासूनच भेगा पडण्यास सुरूवात झाली असून उन्ह देखील चांगलेच तापत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत आणखी भर टाकली आहे. मागीलवर्षी देखील पावसाअभावी रोवण्या खोळंबल्या होत्या. तर याच कालावधीत ३२ हजार ६१६ हेक्टरवर रोवण्या झाल्या होत्या. त्यातुुलनेत यंदा रोवण्या जास्ती झाल्या असल्या तरी दमदार पावसाअभावी नदी, नाले, बोड्या कोरड्या पडल्या असल्याने समस्येत वाढ झाली आहे. सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या मदतीने सध्या केलेली रोवण्या वाचविण्याचे काम सुरू आहे. एकंदरीत पावसाच्या अनिश्चिततेमुळे जिल्ह्यावर कोरडा दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.