रेल्वे गाडीतून दारूची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 09:16 PM2018-08-19T21:16:20+5:302018-08-19T21:20:06+5:30
कॉलेज बॅगमध्ये दारूच्या बॉटल भरून त्याची रेल्वे गाडीतून वाहतूक करीत असलेल्या तिघांना रेल्वेच्या टास्क टीमने रंगेहात पकडले. शनिवारी (दि.१८) रात्री गोंदिया-बल्लारशाह डेमो गाडीत (७८८२०) ही कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कॉलेज बॅगमध्ये दारूच्या बॉटल भरून त्याची रेल्वे गाडीतून वाहतूक करीत असलेल्या तिघांना रेल्वेच्या टास्क टीमने रंगेहात पकडले. शनिवारी (दि.१८) रात्री गोंदिया-बल्लारशाह डेमो गाडीत (७८८२०) ही कारवाई करण्यात आली. तिघांना अटक करून त्यांच्याकडील नऊ हजार ७२४ किमतीची दारू जप्त करण्यात आली.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारुची तस्करी केली जाते. यासाठी दारुची तस्करी करणारे वेगवेगळे मार्ग अवलंबित आहे. दारुची तस्करी करणाऱ्यांनी आता आपली नजर रेल्वे गाड्यांकडे वळविली आहे. गोंदिया-बल्लारशाह रेल्वे गाडीतून सामानाच्या टोपली व कॉलेजबॅगमधून दारुची तस्करी करीत असल्याच्या घटना सुध्दा यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. दरम्यान रेल्वे पोलिसांनी या गाड्यांमधील गस्त वाढविली असून दारुची तस्करी करणाºयावर बारीक नजर ठेवली आहे. स्पेशल टास्क टीमचे उप निरीक्षक विवेक मेश्राम, प्रधान आरक्षक जी. आर. मडावी, आरक्षक पी.एल.पटेल, गुन्हे शाखेचे उप निरीक्षक एस.एस.बघेल, प्रधान आरक्षक आर.सी.कटरे शनिवारी (दि.१८) गोंदिया-बल्लारशाह डेमो गाडीत नजर ठेवून होते. दुपारी १२ वाजतादरम्यान अर्जुनी रेल्वे स्थानकावर त्यांना तिघेजण वजनदार कॉलेज बॅग घेऊन संशयीत अवस्थेत गाडीत चढताना आढळले. यावर टीमने तिघांना पकडून त्यांची नावे विचारली असता त्यांनी रमेश गजानन खोब्रागडे (४०,रा.खरपुंडी बोरिंग,गडचिरोली), नितेश उर्फ बाल्या कवडू गेडाम (३२,रा.ढिमर मोहल्ला, गडचिरोली) व संतोष उर्फ गुड्डू नानाजी भोयर (३१, ढिमर मोहल्ला, गडचिरोली) असे सांगीतले. टीममधील कर्मचाºयांनी विचारपूस केली असता तिघांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. यामुळे त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. यात रमेश खोब्रागडे याच्याकडील दोन बॅग व एका थैलीत देशी दारूच्या ९० मिलीच्या १८८ बॉटल्स, नितेश गेडामकडील बॅगमधून देशी दारूच्या ९० मिलीच्या ९७ बॉटल्स तर संतोष भोयरकडील बॅगमधून देशी दारूच्या ९० मिलीच्या ८९ बॉटल्स सापडल्या. दरम्यान, या तिघांची उलट तपासणी केली असता त्यांनी अर्जुनी-मोरगाव येथून दारू खरेदी करून गडचिरोली येथे अवैध व्यापार करीत असल्याचे सांगीतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे अर्जुनी ते वडसापर्यंतचे रेल्वेचे तिकीट आढळले. मात्र दारूची वाहतूक करण्यासाठी कोणतेही अधिकार पत्र मिळाले नाही. यावर टीमने तिघांना ताब्यात घेत वडसा येथून गोंदियाला आणले. तसेच त्यांच्याकडील एकूण नऊ हजार ७२४ रूपये किमतीच्या देशी दारूच्या ३७४ बॉटल्स पुढील कारवाईसाठी शासकीय रेल्वे पोलिसांच्या सुपूर्द केले.