गंगाबाईत अवैध विक्रीसाठी आणलेली औषधी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:28 AM2021-04-13T04:28:10+5:302021-04-13T04:28:10+5:30
गोंदिया : येथील गंगाबाई रुग्णालयात अवैध विक्रीसाठी आणलेला औषध साठा रविवारी (दि.११) सायंकाळी ६.४५ वाजता जप्त करण्यात आला. जप्त ...
गोंदिया : येथील गंगाबाई रुग्णालयात अवैध विक्रीसाठी आणलेला औषध साठा रविवारी (दि.११) सायंकाळी ६.४५ वाजता जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेली औषधी ३७ हजार रुपये किमतीची आहेत. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक व गोंदिया शहर पोलिसांनी केली आहे.
शहरातील गणेशनगर पररिसरातील रेव्हेन्यू कॉलनीतील रहिवासी सागर सुभाषसिंह बनाफर (३४) याने ३७ हजार रुपये किमतीची औषधी अवैधरीत्या विक्रीकरिता आणली होती. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ती औषध कुणीही आपल्या सोबत ठेवू शकत नाही; परंतु आरोपीने ती औषधी गंगाबाई स्त्री रुग्णालयात विक्रीकरिता आणून ठेवली होती. यासंदर्भात अनेक दिवसांपासून गंगाबाईत औषधी पुरविणारे दलाल सक्रिय असल्याची तक्रार होती; परंतु ठोस पुरावा हातात येत नसल्याने कारवाई होत नव्हती. आरोपी बनाफर याला औषधी विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना रंगेहात पकडण्यात आले.
औषध निरीक्षक प्रशांत राजेंद्र रामटेके (४५) यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यातील ठाणेदार महेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस निरीक्षक प्राजक्ता पवार यांनी ही कारवाई केली. आरोपीवर औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० त्याअंतर्गत नियम १९४५ चे कलम १८ (सी) सहकलम २७ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार ठाकरे करीत आहेत.