दीड वर्षे दारू ढोसली, बिल तर लांबच.. उलट खंडणी मागितली
By नरेश रहिले | Published: December 2, 2023 04:50 PM2023-12-02T16:50:09+5:302023-12-02T16:50:35+5:30
प्रज्वलच्या खुनातील दोन आरोपींनी मागितले होते केसर बारच्या मालकाला पैसे.
नरेश रहिले,गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम कुडवा येथील आंबेडकर चौक येथील रहिवासी प्रज्वल अनिल मेश्राम (२०) याचा खून करणाऱ्या आरोपी संकेत अजय बोरकर (२०) व आदर्श बाबुलाल भगत (२१) यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांसह बालाघाट रोडवरील बसंतनगर येथील केसर बार ॲण्ड रेस्टॉरंट येथे दीड वर्षे दारू पिऊन बिल दिले नाही. उलट बारमालकाला ५० हजार रुपयांची खंडणी मागत धमकी दिल्याने त्या चौघांवर शुक्रवारी (दि. १) डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बालाघाट रोडवरील केसर बार ॲण्ड रेस्टॉरंटचे मालक महावीर वॉर्ड गणेशनगर येथील रहिवासी अशोक शिवगणेश पाठक (५८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी दुर्गेश ऊर्फ डेनी रमेश खरे (३१, रा. बसंतनगर), शाहरूख फरीद खान पठाण (२९, रा. गड्डाटोली), आदर्श ऊर्फ बाबुलाल भगत (२१, रा. कन्हारटोली) व संकेत अजय बोरकर (२१, रा. कन्हारटोली) या चौघांनी जून २०२२ पासून केसर बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये वेळोवेळी दारू पिऊन दारूचे बिल दिले नाही. उलट ते बारमालक पाठक व वेटर्सना ठार मारण्याची व दुकान जाळण्याची धमकी देत होते. एवढेच नव्हे तर त्यांनी पाठक यांना २५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.
पाठक यांनी मागील बिलासंदर्भात आरोपी दुर्गेश खरे याला विचारले असता त्याने धमकी देत ५० हजार रुपये खंडणीची मागणी केली व पैसे न दिल्यास ठार करण्याची धमकी दिली होती. शिवाय, त्यांच्याजवळून बळजबरीने १५ हजार रुपये हिसकावून घेतले होते. शाहरूख पठाण यानेही आपल्याजवळील शस्त्राचा भाग दाखवून बिल मागितल्यावरून पाठक यांना शस्त्राचा धाक दाखवून ठार करण्याची धमकी दिली. प्रकरणी रामनगर पोलिसांनी भादंवि कलम ३८६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
फेरीवाल्यांकडून करतात हप्ता वसुली-
या प्रकरणातील चारही आरोपी गोंदियातील फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली करीत असल्याची तक्रार केसर बार ॲण्ड रेस्टॉरंटचे मालक अशोक पाठक यांनी रामनगर पोलिसात दिली आहे.
पैसे मागितल्यास दाखवित होते देशी कट्टा-
केसर बार ॲण्ड रेस्टॉरंटच्या फ्रीजमध्ये ठेवलेली दारू आरोपी स्वत:च फ्रीज उघडून पित असत. त्यांना पैसे मागितल्यावर ते आपल्याजवळील देशीकट्टा दाखवून बार मालकाला धमकावत असत. मर्डर करून आताच आलो पोलिसांना तक्रार केली तर याद राख अशी धमकी देत असत.
धमकी दिल्याने बारमालकाने दिले १५ हजार-
केसर बार ॲण्ड रेस्टॉरंटमधील कामगारांसोबत आरोपींचा वाद झाल्याने कामगार उद्यापासून बारमध्ये येणार नाहीत आले तर कामगारांना आणि बारला आग लावू, अशी धमकी आरोपींनी दिली. आता बारही चालू देणार नाही, बार चालवायची असल्यास ५० हजार रुपये खंडणी द्या, अशी मागणी आरोपींनी केली होती. भीतीपोटी पाठक यांनी त्या आरोपींना २८ नोव्हेंबर रोजी १५ हजार रुपये दिले होते.
महिन्याकाठी २५ हजार रुपये खंडणीची मागणी-
केसर बार ॲण्ड रेस्टॉरंटच्या चालकाकडे बार सुरू ठेवण्यासाठी दर महिन्याला २५ हजार रुपये खंडणी द्यावी, अशी आरोपींची मागणी होती. आरोपीला पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी त्यांना धमकावित असल्याने यासंदर्भात रामनगर पोलिसात तक्रार करण्यात आली.