नातूच ठरला वृद्ध आजोबांचा काळ, गळा दाबून केले ठार

By नरेश रहिले | Published: September 4, 2023 05:26 PM2023-09-04T17:26:53+5:302023-09-04T17:27:05+5:30

गिरोला येथील घटना, आरोपीला केली अटक

drunk grandson killed old grandfather in gondia | नातूच ठरला वृद्ध आजोबांचा काळ, गळा दाबून केले ठार

नातूच ठरला वृद्ध आजोबांचा काळ, गळा दाबून केले ठार

googlenewsNext

गोंदिया : पत्नी व आईला घरात लपवून ठेवल्याच्या संशयातून नातवानेच आपल्या वृद्ध आजोबांना गळा दाबून ठार केले. डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम गिरोला येथे शनिवारी (दि. २) रात्री ११:३० वाजेदरम्यान ही घटना घडली. या प्रकरणातील निष्ठूर नातवाला पोलिसांनी अटक केली आहे. यशवंत माधो कापगते (६७, रा. गिरोला) असे मृत आजोबाचे नाव आहे.

डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम गिरोला येथील मृत यशवंत माधव कापगते (६७) यांना दोन मुले असून ते वेगवेगळे राहतात. यशवंत कापगते आपल्या धाकट्या मुलासोबत आरोपी रोशन अशोक कापगते (२६) यांच्या शेजारी राहतात. रोशन कापगते हा थोरल्या मुलाचा मुलगा (नातू) आहे. तो मागील अनेक दिवसांपासून दारू पिऊन घरातील मंडळींसोबत भांडण करून मारहाण करीत होता.

शनिवारी (दि. २) त्याने घरी भांडण केल्यामुळे तो मारहाण करणार या भीतीने आई व पत्नी घरातून निघून गेले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास रोशन बाहेरून आला असता, यावेळी यशवंत कापगते हे आपल्या घराच्या मुख्य दारावर बाथरूमकरिता जाण्यासाठी आले. यावेळी रोशनने त्यांच्या घराच्या मुख्य द्वाराजवळ येऊन पत्नी व आई कुठे गेली, असे विचारले.

यासंदर्भात आपल्याला काहीच माहिती नाही, असे यशवंतने म्हटल्यावर रोशनने त्यांना शिवीगाळ केली. त्याच्या भीतीने यशवंत आत गेले व दार उघडले नाही म्हणून आरोपीने रागाच्या भरात दाराला लाथ मारून आपला राग व्यक्त केला. तसेच थोड्या वेळाने परत शिवीगाळ करीत आज तुझा मर्डर करतो, शिक्षा भोगून घेईन असे म्हणत त्याने यशवंत यांचा गळा दाबून खून केला. या घटनेसंदर्भात रविवारी (दि. ३) दुपारी १ वाजता रेखा राधेश्याम झोडे (५०, रा. गिरोला) यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक सिंगनजुडे करीत आहेत.

नालीत ढकलल्याने डोक्याला गंभीर दुखापत; गळाही दाबला

- आई आणि पत्नीला आपल्या घरी ठेवले, असे म्हणत आरोपी रोशन कापगते याने आजोबा यशवंत कापगते यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याने रागाच्या भरात त्यांना नालीत ढकलले. नाली सिमेंटची असल्यामुळे यशवंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नालीत पडल्यावर रोशन त्यांच्या छातीवर बसला व यशवंत यांचा गळा दाबला. दुसऱ्या हाताच्या कोहनीने त्यांच्या छातीवर मारले होते.

आरोपीला अटक; दोन दिवसांचा पीसीआर

- आरोपी रोशन कापगते याला रविवारी अटक करण्यात आली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली होती

आरोपी रोशन हा दारूच्या आहारी गेला होता. त्याच्या वाढलेल्या व्यसनामुळे घरातील सर्व लोक त्रस्त झाले होते. त्याची पत्नी सततचे भांडण व मारहाणीला कंटाळून लेकरांना घेऊन माहेरी गेली होती.

Web Title: drunk grandson killed old grandfather in gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.