व्यसनमुक्ती दिंडीने दुमदुमली राईस सिटी
By admin | Published: January 23, 2016 12:15 AM2016-01-23T00:15:57+5:302016-01-23T00:15:57+5:30
एरवी एखादा मोर्चा, रॅलीने दुमदुमणारे गोंदिया शहर शुक्रवारी वेगळ्याच वातावरणाने भारावून गेले होते.
गोंदिया : एरवी एखादा मोर्चा, रॅलीने दुमदुमणारे गोंदिया शहर शुक्रवारी वेगळ्याच वातावरणाने भारावून गेले होते. राज्याच्या राजधानीपासून टोकावर वसलेल्या गोंदिया जिल्ह्यात आयोजित दोन दिवसीय चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी ९ वाजता येथील इंदिरा गांधी स्टेडिअममधून निघालेली व्यसनमुक्ती दिंडी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. गोंदिया शहरातील व्यसनमुक्तीच्या चळवळीत स्वत:ला झोकून देणाऱ्या युवावर्गाने, सामाजिक कार्यकर्त्यांनी या दिंडीत उपस्थिती लावलीच तसेच शहारातील अनेक शाळा व महाविद्यालयातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने दिंडीमध्ये सहभाग घेतला.
इंदिरा गांधी स्टेडियम येथे व्यसनमुक्ती दिंडीच्या शुभारंभप्रसंगी व्यसनमुक्तीच्या चित्ररथातून पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. यावेळी बोलताना पालकमंत्री बडोले म्हणाले, गोंदिया जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जातो. मागास व विकासापासून कोसो दूर असलेल्या गोंदिया जिल्ह्याला नैसर्गिक संपन्नता लाभली असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, इथल्या पर्यटनस्थळातून अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याची क्षमता आहे. देशाला बलशाली व संपन्न राष्ट्र करण्यासाठी इथला युवक आधी व्यसनमुक्त झाला पाहिजे.
तरुणांच्या श्रमशक्तीचा वापर बलशाली महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी व्यसनमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प पालकमंत्र्यांनी यावेळी जाहीर केला. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देऊन स्टेडियम परिसरात व्यसनमुक्तीची वातावरणनिर्मिती केली. यावेळी राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, महावीर मारवाडी उच्च माध्यमिक शाळा, मुन्नालाल चौहाण जनता हायस्कूल, चुटीया, नुतन विद्यालय, श्रीगुरूनानक हिंदी माध्यमिक महाविद्यालय, रवींद्रनाथ टागोर हायस्कूल, जे.एम. हायस्कूल, आदर्श हिंदी स्कूल, मनोहर नगरपरिषद माध्यमिक विद्यालय, मनोहर नगरपरिषद हायर सेंकडरी, एन.एम.डी. महाविद्यालय, गायत्री परिवार, प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेचा सेवकवर्ग यासह गोंदिया शहरातील अनेक विद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
ही दिंडी स्टेडियम येथून नेहरु चौक-गोरेलाल चौक-गांधी पुतळा चौक येथे पोहोचली. यावेळी पालकमंत्र्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ही दिंडी संमेलनस्थळ असलेल्या स्वागत लॉन येथे पोहोचली. व्यसनमुक्ती दिंडीमुळे शहरात एक व्यसनमुक्तीचे वातावरण तयार झाले. अनेकांनी व्यसनमुक्त होण्याचा संकल्प केला. दिंडीतील पालखीमध्ये असलेले भारतीय संविधान, कल्याणी यात्रा, आनंद यात्री यासह अन्य व्यसनमुक्तीचा संदेश देणारी पुस्तके उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. (जिल्हा प्रतिनिधी)
दिंडीत मान्यवरांचा सहभाग
विद्यार्थ्यांच्या हाती असलेले व्यसनमुक्तीचे घोषणाफलक लक्ष वेधून घेत होते. या दिंडीत पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासोबत संमेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अभिनेत्री निशा परुळेकर, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विलास, ज्येष्ठ पत्रकार तुळसीदास भोईटे, अतिरिक्त समाजकल्याण आयुक्त स.प. पाटोळे, उपायुक्त पी.बी. बच्छाव, प्रादेशिक उपायुक्त नागपूर माधव झोड यांच्यासह गोंदिया शहरातील व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था, त्यांचे पदाधिकारी, विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले होते.