कर्मचाऱ्यांअभावी महसूलाची कामे खोळंबली

By Admin | Published: June 30, 2017 01:26 AM2017-06-30T01:26:58+5:302017-06-30T01:26:58+5:30

महसूल विभागात वाढता कामाचा बोजा असतानाच तहसीलदारांकडे नगर पंचायतचे प्रशासक म्हणून अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे.

Due to the absence of employees revenue revenues | कर्मचाऱ्यांअभावी महसूलाची कामे खोळंबली

कर्मचाऱ्यांअभावी महसूलाची कामे खोळंबली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : महसूल विभागात वाढता कामाचा बोजा असतानाच तहसीलदारांकडे नगर पंचायतचे प्रशासक म्हणून अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. त्यावर तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची सतत गैरहजेरी दाखवून दुखत्या नाडीवर बोट ठेवण्याचे काम केले जात असल्याचे चित्र सध्या येथील तहसील कार्यालयात बघावयास मिळत आहे.
तहसील कार्यालय हा तालुक्याच्या एक सर्वात महत्वाचा विभाग असून सामान्य जनतेपासून प्रत्येक घटकाशी निगडीत महसूल विभाग कामाच्या दृष्टीकोनातून फारच महत्वाचा आहे. परंतु सध्या येथील तहसील कार्यालयाला ग्रहण लागले असून राहू काळात चालत आहे. याचा थेट फटका समाजातील प्रत्येक घटकासह तालुक्यातील नागरिकांवर पडत आहे. येथील तहसील कार्यालयासाठी एक तहसीलदारासह चार नायब तहसीलदारांचे पद मंजूर आहे. यात निवडणूक विभागातील नायब तहसीलदारांचे पद रिक्त आहे. बाकी तीन पैकी संजय गांधी निराधार विभागाशी संबंधीत नायब तहसीलदार डी.के.बारसे देवरी येथे समायोजनावर पाठविण्यात आले आहेत.
सामान्य प्रशासनातील नायब तहसीलदार एस.एन.बारसागडे कार्यरत आहेत. परंतु ते नेहमी बेपत्ता राहत असून कोणत्या न कोणत्या कारणाने रजेवर असल्याचे सांगत असतात. आणखी एक नायब तहसीलदार एस.जी.खाडे चार महिन्यांपूर्वी येथे रुजू झाले होते. परंतु सुरुवातीचे काही कार्यालयात हजर राहिल्यानंतर मागील मार्च महिन्यापासून सतत सुटीवर आहेत. त्यामुळे संबंधीत विभागाची कामे खोळंबली असून काही महत्वाच्या व नियमित कामाचा ताण तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या डोक्यावर वाढला आहे. त्यांना अनेक कामे सकाळ पासून उशीरा रात्रीपर्यंत कार्यालयात बसून करावी लागत आहेत.
त्याशिवाय साप्ताहिक मासीक बैठका घेणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकांत हजेरी लावणे तसेच नैसर्गिक-अनैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची कामे हाताळणे इत्यादी आकस्मिक कामे केव्हा आणि कोणत्या वेळी येऊन ठेपतील याबाबत सांगता येत नाही. अशात सर्व नायब तहसीलदारांनी लापरवाहीने कर्तव्य बजावणे किती योग्य आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांची पदे सुद्धा रिक्त असल्याने अनेक कामे वेळेवर होताना दिसत नाही. यात अव्वल कारकूनचे तीन पद मंजूर असून त्यात एक पद रिक्त आहे. कनिष्ठ लिपीकाची सात पदे मंजूर असून त्यातील तीन पदे रिक्त आहेत. या व्यतिरीक्त इंदिरा गांधी विधवा पेंशन योजनेत एक पद, संजय गांधी निराधार योजनेत एक पद, पुरवठा विभागात एक पद, शिपाई एक पद रिक्त आहे. अशी एकूण आठ पदे रिक्त असून याचा थेट फटका दैनंदिन कामकाजावर पडत आहे.
सध्या विद्यार्थ्यांची वरच्या वर्गासाठी किंवा व्यवसायीक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी धावपळ सुरु असून विविध प्रमाणपत्रांसाठी त्यांना तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. परंतु त्यांची कामे वेळेवर होताना दिसत नाही. दरम्यान तहसीलदार सांगळे इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने किंवा अस्थायी कार्यरत युवकांच्या सहकार्याने जास्तीतजास्त कामे आटोपण्याचा पूरेपूर प्रयत्न करीत आहेत.

नगर पंचायतचा अतिरिक्त कारभार
अडीच वर्षापूर्वी शासनाने सालेकसा ग्रामपंचायतला नगर पंचायत घोषित केले होते. तेव्हा तहसीलदारांना तात्पुरते प्रशासक नियुक्त करुन न.प.निवडणूक होईपर्यंत कामकाज पाहण्याची जबाबदारी दिली होती. परंतु निवडणूक कार्यक्रम दोन वेळा रद्द झाल्याने मागील अडीच वर्षांंपासून आजही प्रशासकाचा अतिरिक्त कारभार सांभाळावा लागत आहे.

Web Title: Due to the absence of employees revenue revenues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.