बेंचेसमुळे गोरेगावच्या सौंदर्यात भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2017 01:01 AM2017-04-05T01:01:43+5:302017-04-05T01:01:43+5:30
येणारा उद्या अधिक उत्तम असावा, या विचाराला साकार करण्यासाठी गोरेगाव येथील गायत्री परिवार पुढे सरसावला आहे.
लोकसहभागातून बैठक व्यवस्था : गायत्री परिवाराचा उल्लेखनीय उपक्रम
गोरेगाव : येणारा उद्या अधिक उत्तम असावा, या विचाराला साकार करण्यासाठी गोरेगाव येथील गायत्री परिवार पुढे सरसावला आहे. त्या अंतर्गत स्वच्छता व जलस्रोतांचे शुद्धीकरण तथा सौंदर्यीकरणाचे कार्य केले जात आहे. यात स्थानिक लोकांच्या सहकार्याने २० सिमेंट (गार्डन) बेंचची सोय शहरात ठिकठिकाणी करण्यात आली आहे.
यात १५ बेंचेस पवन तलाव परिसरात, दोन बेंचेस गोरोबा काका मंदिर प्रभाग-१४, एक बेंच बाजार चौक गोरेगाव व एक बेंच रविदास स्मारक प्रभाग-९ मध्ये लावण्यात आला. विशेष म्हणजे जवळपास ५० हजार रूपये किमतीचे हे बेंचेस विना शासकीय मदतीने लोकांनी दिलेल्या दानातून लावण्यात आले.
पवन तलाव परिसर आतापर्यंत केरकचऱ्याचे माहेरघर म्हणून परिवर्तीत होत होते. तेथे मागील १ जानेवारी २०१७ पासून गायत्री परिवार, दिया संघटना व युवाशक्ती स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दर रविवारी आपली वेळ देवून स्वच्छतेचे कार्य केले जात आहे.
अभियंता आशीष बारेवार यांनी सांगितले की, शहरात एकही बालोद्यान नसल्याची तक्रार नागरिक अनेक दिवसांपासून करीत होते. ही समस्या आता काही दिवसातच संपुष्ठात येण्याची शक्यता दिसून येत आहे. तसेच भविष्यात याला आणखी विकसित करण्याची योजना आहे. सदर कार्य लोकसहभागातून करण्यामागे काही हेतू असल्याचे ते म्हणाले. लोकसहभागामुळे लोकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते. त्यामुळे या जागेची देखभाल योग्यरित्या होवू शकेल, असे त्यांनी सांगितले.
सिमेंट बेंच दानदात्यांमध्ये आशीष बारेवार, नितीन बारेवार, राहुल कटरे, अरविंद जायस्वाल, रूस्तम येडे, पांडुरंग साखरवाडे, जैन रिसोर्ट गोरेगाव, योगेश बारेवार, हितेश बिसेन, गोपाल हत्तीमारे, सम्मू परिवार, टीटू जैन, विवेक देशमुख, अनिकेत बघेले, मयूर कोरेकर, मार्कंडराव वैद्य, जितेंद्र बिसेन, पवन सोनवाने, शशीकला बागडकर यांचा समावेश आहे.
सर्व दानदात्यांचा तथा सर्व स्वच्छता अभियानात सहभाग देणाऱ्यांचा पुरूषोत्तम साकुरे, भाऊलाल गौतम, संजय बारेवार, संजय घासले व गायत्री महिला मंडळाने आभार व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)