कोरोनामुळे पुन्हा लालपरीत मोजकेच प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:28 AM2021-03-26T04:28:53+5:302021-03-26T04:28:53+5:30
गोंदिया : कोरोनाचा पुन्हा एकदा कहर वाढू लागल्याने नागरिकांनी प्रवास टाळला असून याचा परिणाम मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन ...
गोंदिया : कोरोनाचा पुन्हा एकदा कहर वाढू लागल्याने नागरिकांनी प्रवास टाळला असून याचा परिणाम मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या एसटीवर जाणवत आहे. प्रवासी संख्येत घट होत असल्याने आता मोजक्याच प्रवाशांना घेऊन एसटी धावत असताना दिसत आहे. परिणामी येथील आगाराच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत असून सुमारे ४० टक्के उत्पन्नात घट झाल्याची माहिती आहे.
मध्यंतरी कोरोना नियंत्रणात आल्याने जनजीवन पूर्वपदावर आले होते. दैनंदिन जीवन जागताना नागरिक कोरोनाला बाजूला सोडून आपल्या कामाला लागले होते. अशात मागील वर्षभर खोळंबलेले त्यांचे जीव पूर्वपदावर येत असतानाच त्यांचा प्रवासही सुरू झाला होता. परिणामी एसटीची भरभराट होत होती. मात्र कोरोनाने पुन्हा एकदा कहर केला असून यामुळे नागरिकांनी प्रवास टाळला आहे. यामुळे आता परत एसटी मोजक्याच प्रवाशांना घेऊन धावताना दिसत आहे. विशेष म्हणजे, मध्यप्रदेशातील फेऱ्या बंद झाल्याने त्याचाही फटका बसत आहे.
----------------------------
४५ बसेस दररोज
गोंदिया आगारातून आजघडीला ४५ बसेस दररोज ये-जा करीत आहेत. बसेस सुरू असल्या तरिही कोरोनाचा प्रादुर्भाव बघता नागरिकांनी आता बाहेरगावी जाणे टाळले आहे. परिणामी मध्यंतरी भरून धावत असलेल्या लालपरीत आता मोजकेच प्रवासी दिसत आहेत.
- विशेष म्हणजे, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांना जोडणारा गोंदिया जिल्हा असून यामुळेच येथील आगारातून दोन्ही राज्यांत एसटी जाते. मात्र सध्या मध्यप्रदेश राज्याने प्रवेशबंदी केल्याने तेथील फेऱ्या बंद असून त्याचाही फटका बसत आहे.
----------
वेटींगची गरजच नाही
कोरोनाचा प्रादुर्भाव बघता नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रवास करणे टाळले आहे. परिणामी प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. यामुळे जिल्ह्यातून प्रवासासाठी आरक्षणाची गरज नाही. त्यातही आगारातून नागपूरसाठी आरक्षण होतात. मात्र आता प्रवासी घटले असून त्यातही दिवसभर बसेस असल्याने आरक्षणाची गरज नसते.
----------------------------
फक्त १ रातराणी
गोंदिया आगाराला फक्त एक रातराणी देण्यात आली असून विशेष बाब म्हणजे, अवघ्या विभागातून फक्त गोंदियालाच ही रातराणी देण्यात आली आहे. ही रातराणी दररोज रात्री नांदेडसाठी निघते. मात्र सध्या कोरोनामुळे रातराणीच काय सर्वच बसेसला प्रवासी कमी झाले आहेत.
---------------------------
जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली
गोंदिया जिल्हा राज्याच्या टोकावरील जिल्हा असून लागून छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्य आहे.अशात कामानिमित्त म्हणा किंवा नातेसंबंध जपण्यासाठी जिल्हावासीयांना बाहेर पडावेच लागते. मात्र आजघडीला गोंदिया लागून असलेल्या अन्य जिल्ह्यात कोरोनाने जास्तच कहर केला आहे. अशात नागरिक अन्यत्र जाणे टाळत आहेत. यामुळे जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली आहे.
---------------------------
कोट
कोरोनाचा वाढता कहर बघता आता नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रवास टाळला आहे. यामुळेच प्रवाशांची संख्या घटली असून आगाराचे सुमारे ४० टक्के उत्पन्नही घटले आहे. त्यात मध्यप्रदेश राज्यातील फेऱ्या बंद पडल्याने अधिकचा फटला बसला आहे.
- संजना पटले
आगार प्रमुख, गोंदिया.