भरधाव बस घसरून अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:22 PM2019-07-21T22:22:36+5:302019-07-21T22:22:59+5:30
मातीने माखलेल्या रस्त्यावरून भरधाव एसटी घसरून झालेल्या अपघातात पाच प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.२१) सकाळी ७ वाजताच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील मलपुरी गराडा मार्गावर मार्गावर घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : मातीने माखलेल्या रस्त्यावरून भरधाव एसटी घसरून झालेल्या अपघातात पाच प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.२१) सकाळी ७ वाजताच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील मलपुरी गराडा मार्गावर मार्गावर घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
राज बिसेन(१३) बाळापूर, समुर बिसेन (१३) डोंगरगाव,तारेंद्र रहांगडाले (१३) डोंगरगाव, हिमानी उके (१४) रा.सुकडी असे या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार तिरोडा आगाराची एसटी बस क्रमांक एमएच ४०, ९८७४ ही रविवारी सकाळी आपली पहिली फेरी सुकडी ते तिरोडा या मार्गावर ७ वाजताच्या सुमारास धावत होती.दरम्यान मलपुरी ते गराडा रस्त्यावर पसरलेल्या ओल्या मातीमुळे भरधाव बस रस्त्यावरून घसरू लागली. बस चालकाने वेळीच नियंत्रण मिळविल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उतरली.सुुदैवाने बस पलटी होता होता बचावली अन्यथा मोठा अपघात घडला असता. यात बसमधील पाच प्रवाशी किरकोळ जखमी झाले.बसमध्ये सुमारे ३५ प्रवासी प्रवास करीत होते.
या प्रकारामुळे बसमधील प्रवाशी काहीवेळ धास्तीत होते. चालक वाहकाने या अपघाताची माहिती तिरोडा आगाराला लगेच दिल्यानंतरही दोन तास लोटूनही कुठलीच मदत वाहन घटनास्थळी पाठविण्यात आले नव्हते.त्यामुळे प्रवाशांनी यावर तीव्र रोष व्यक्त केला.