मुसळधार पावसामुळे वन तलाव फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:55 PM2018-07-18T22:55:21+5:302018-07-18T22:55:40+5:30
जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गोरेगाव तालुक्यातील मुरदोली, हिराटोला, कालीमाटी येथील चार वन तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गोरेगाव तालुक्यातील मुरदोली, हिराटोला, कालीमाटी येथील चार वन तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कंत्राटदारामार्फत करण्यात आलेल्या तलावाच्या बांधकामावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार मुरदोली, कालीमाटी व हिराटोला येथे (दोन वनतलाव) असे एकूण चार वनतलाव शासनाने २०१७-१८ यावर्षी मंजूर केले. त्या अनुषंगाने शासनाने माती काम मग्रारोहयो अंतर्गत तर पिचिंग व वेस्ट वेयरचे काम कंत्राटदारांना दिले होते. यातील चारही वन तलावाचे कामे जून २०१८ मध्ये पूर्ण करण्यात आले. दरम्यान जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी झालेल्या संततधार पावसामुळे महिनाभरापूर्वी बांधकाम करण्यात आलेले चारही वन तलाव फुटले. तलावाची पाळ फुटल्याने सर्व पाणी वाहून गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रत्येक तलावाच्या कामासाठी शासनाने १५ लाख व उर्वरीत कामासाठी ९ लाख ९९ हजार असे एकूण एका तलावासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. शासनाच्या जलसंवर्धनाच्या उद्देशातून
या तलावांचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र चुकीच्या नियोजनाचा या वन तलावांना फटका बसला. वेस्टवेअरचे बांधकाम चुकीने केल्याने वन तलावाची पाळ फुटल्याचे बोलल्या जाते. विशेष म्हणजे हिराटोला येथील एका वन तलावाच्या पाळीची व वेस्ट वेअरची उंची जवळपास सारखीच असल्यामुळे पाळीला २० फुटाचे भगदाड पडले असल्याचे गावकºयांनी सांगितले. दरम्यान एकाच पावसाने २५ लाख रुपये खर्चून करुन तयार करण्यात आलेल्या वन तलावांच्या बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. यासर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
संततधार पावसामुळे वन तलावात भरपूर पाणी साचले, पाळीचे बांधकाम नुकतेच करण्यात आले होते. त्यामुळे तलावाची पाळ फुटली. मात्र लवकरच तलावाची दुरूस्ती केली जाईल.
एस.एम.जाधव, वनक्षेत्राधिकारी गोरेगाव.