पावसाअभावी परिसरात धान रोवणी खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:20 AM2021-07-20T04:20:59+5:302021-07-20T04:20:59+5:30
केशोरी : या वर्षी हवामान खात्याने दमदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात शेतीची मशागत करून ...
केशोरी : या वर्षी हवामान खात्याने दमदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात शेतीची मशागत करून रोवणी सुरू केली, परंतु गेल्या ८-१० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे धानरोवणी खोळंबली असून, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
परिसरात मृग नक्षत्रात एकसारखा पाऊस येत राहिला. रब्बी धानाचा हंगाम आटोपताच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील धानाचे पऱ्हे टाकले. सतत पाऊस येत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची खार भरून धान पेरणी आटोपली. मान्सूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकरी सुखावला होता. धानाचे पऱ्हे वाढल्याबरोबर शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली. मात्र, आर्द्रा नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची रोवणी थांबली. ज्यांच्याकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे, त्यांची रोवणी सुरू राहिली, परंतु कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी, पावसावर अवलंबून आहेत, त्या शेतकऱ्यांची धान रोवणी खोळंबली आहे. गेल्या ८-१० दिवसांपासून परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत दिसून येत आहे. दमदार पावसाची गरज आहे, त्याशिवाय धानाच्या रोवणीला जोर येणार नाही.