‘लॉकडाऊन’मुळे रोजी गेली; रोटी देणार ‘शिवभाेजन थाळी’! (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:28 AM2021-04-17T04:28:51+5:302021-04-17T04:28:51+5:30
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर असल्याने या लाटेत सर्वांचे रोजगार बंद करण्यात आले. या रोजगार बंदीमुळे तळहातावर ...
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर असल्याने या लाटेत सर्वांचे रोजगार बंद करण्यात आले. या रोजगार बंदीमुळे तळहातावर कमवून खाणारे व गोरगरिबांना जेवण देण्यासाठी राज्य सरकारने शिवभोजन मोफत देण्याचे ठरविले आहे. गोंदिया जिल्ह्यात शिवभोजन देणारे एकूण १० केंद्र उघडण्यात आले. या १० केंद्रांचे मिळून १ हजार लोकांना दररोज मोफत जेवण दिले जाणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक शिवभोजन थाळीचे केंद्र देण्यात आले, तर गोंदिया शहरासाठी दोन केंद्र देण्यात आले आहेत. असे एकूण १० केंद्र जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. आमगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव, तिरोडा व गोंदिया या प्रत्येक तालुक्यात एक केंद्र देण्यात आले, तर गोंदिया शहरात दोन केंद्र देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील केंद्रांना प्रत्येकी ७५, तर शहरातील केंद्रांना २०० थाळी दररोज देण्याची मुभा आहे.
.......
जिल्ह्यात शिवभोजन थाळी केंद्र-१०
दररोज कितीजण घेतात लाभ-१०००
...........
१ हजारजणांना मिळतो लाभ
१) गोंदिया शहरात दोन केंद्र असून प्रत्येक केंद्राला २०० थाळी मोफत जेवण देण्यात येत आहे. ही योजना १५ एप्रिलपासून गोंदिया जिल्ह्यात मोफत सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखेडे यांनी दिली आहे.
२) ग्रामीण भागातील प्रत्येक शिवभोजन केंद्राला फक्त ७५ थाळी भोजन देण्याचीच मुभा आहे. काल गुरुवारपासून सुरू झालेल्या या उपक्रमात फोटो, आधारकार्ड घेऊन जाणाऱ्यांना मोफत जेवण दिले जात आहे.
.........
थाळीचा लाभ घेणारे
शासनाने मोफत जेवणासाठी शिवभोजन योजना या संकटाच्या काळात सुरू केली; परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोरोनाचा सामना करीत जेवण घेण्यासाठी रांगेत राहून पहिले आवो पहिले पाओ असेच करावे लागते.
-दीनदयाल नेवारे, लाभार्थी.
......
ग्रामीण भागात दररोज ७५ मोफत थाळी देण्याचे उद्दिष्ट असल्याने एका तालुक्यात फक्त ७५ लोकच उपाशी असतील का. शासनाने केंद्रही कमी दिले आणि त्या केंद्रावर लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्याही कमीच केली आहे. त्यामुळे पोटाची आग विझविण्यासाठी आधी रांगेत राहावे लागते.
- परमानंद हिरापुरे, लाभार्थी.
........
हातात पैसा नाही, पोटाची आग सतावते आणि कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. आधारकार्डच नाही मग आम्हाला लाभ मिळत नाही. आम्ही उपाशीच राहावे का? आमची तरी कुणी तजवीज करावी. आधी पैसे देऊन जेवत होतो. आता जेवणच मिळत नाही.
-रामू बहेकार, लाभार्थी.