कमी पावसावर धूळ पेरणीचा पर्याय योग्य

By admin | Published: July 1, 2014 11:31 PM2014-07-01T23:31:28+5:302014-07-01T23:31:28+5:30

आतापर्यंत जिल्ह्यातील १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केल्या आहेत. यापैकी आठ ते नऊ हजार हेक्टर क्षेत्रातील रोपवाटिकेचे क्षेत्र पाऊस आल्यानंतरचे आहे.

Due to low rainfall, suitable for dust sowing | कमी पावसावर धूळ पेरणीचा पर्याय योग्य

कमी पावसावर धूळ पेरणीचा पर्याय योग्य

Next

देवानंद शहारे - गोंदिया
आतापर्यंत जिल्ह्यातील १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केल्या आहेत. यापैकी आठ ते नऊ हजार हेक्टर क्षेत्रातील रोपवाटिकेचे क्षेत्र पाऊस आल्यानंतरचे आहे. यापैकी २० ते २५ टक्के क्षेत्रातील म्हणजे जवळपास तीन ते चार हजार हेक्टर क्षेत्रातील रोपवाटिका पावसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ही वेळ येऊ नये आणि कमी पावसात अधिक उत्पन्न घेण्यासाठी धूळ पेरणी हा पर्याय चांगला असल्याचे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सध्या पावसाच्या हुलकावणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नेमके काय केले पाहीजे याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी कुरील यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क करून त्यांचा सल्ला जाणून घेतला. सामान्यत: जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत रोवणी पूर्ण होणे आवश्यक असते. त्यावेळी रोवणी पूर्ण झाली तर रोपांना पावसाचा पूर्ण फायदा मिळतो. मात्र पाऊस कमी प्रमाणात पडला तर शक्यतो भात लागवडीत बदल करून खर्चात बचत व उत्पादनात वाढ करण्यासाठी धूळ पेरणी हा पर्याय आहे. यासाठी जमिनीत पुरेशा प्रमाणात बिया अंकुरीत होईपर्यंत किंवा धूळ पेरणीद्वारे धानाची पेरणी तिफनीने करावी. यासाठी एकरी १५ ते २० किलोपर्यंत बियाणे पुरेशे होतात.
पेरणीपूर्वी १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मिठ (तीन टक्के) या प्रमाणात द्रावण तयार करावे. त्यात बियाणे भिजवून ठेवावे. द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके बियाणे चाळणीने काढावे. तळातील बियाणे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून २४ तास सावलीत वाळवावे. नंतर तीन ग्रॅम थायरम बुरशीनाशक प्रतिकिलो बियाणे अशी बीज प्रक्रिया करावी असे कुरील यांनी सांगितले.
धूळ पेरणी केल्यास जमिनीची आर्द्रता व उष्णतेद्वारे बिया जोमाने अंकुरीत होतात. रोपे जोमदार असल्याने जमिनीतील अन्नद्रव्य शोषून घेण्याची प्रक्रिया जोमदारपणे होते. त्यामुळे उत्पन्नात १५ ते २० टक्के वाढ होते. जमीनही भूसभूसीत राहून रबी पिकासाठी कमी खर्चात जमीन तयार होते. या पद्धतीतून भात पिकांचे उत्पादन घेतल्यास चिखलणीद्वारे भात लागवड केलेल्या पिकांच्या तुलनेत किमान २० दिवस अगोदर पीक तयार होते. रबीसाठी उशिरा पडणाऱ्या पावसाचा फायदा या पिकांना होतो. ही पद्धत आवत्या भात पद्धतीची असून बदल फक्त तिफणीने पेरणीचा आहे. ही पद्धत वापरल्यास प्रतिकूल हवामानातही भाताचे उत्पादन मिळू शकते. शेतकऱ्यांनी अनुभव म्हणून या पद्धतीचा अवलंब करावा. जून महिन्यात सिंदेवाही येथे पार पाडलेल्या विभागीय संशोधन व विस्तार परिषदेत कृषी तज्ज्ञांनी असाच सल्ला दिल्याचे कृषी अधीक्षक कुरील यांनी सांगितले.
यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पाच टक्के कमी राहण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्याची जून महिन्यात पावसाची सरासरी २०० मिमी इतकी आहे. त्या तुलनेत ११० मिमी इतकाच पाऊस झालेला आहे.

Web Title: Due to low rainfall, suitable for dust sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.