राष्ट्रीय महामार्गामुळे ४८ गावातील पाणी पुरवठ्यावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 09:07 PM2019-05-04T21:07:39+5:302019-05-04T21:08:26+5:30

कोरची, चिचगड, देवरी, आमगाव, गोंदिया या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ वरील ४८ गावांना आमगाव दरम्यान बनगाव पाणी पुरवठा योजनेने पाण्याची लाईन जोडली आहे. पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन जमीनीपासून चार फूट खोलवर आहे.

Due to the National Highway, 48 villages are facing crisis in water supply | राष्ट्रीय महामार्गामुळे ४८ गावातील पाणी पुरवठ्यावर संकट

राष्ट्रीय महामार्गामुळे ४८ गावातील पाणी पुरवठ्यावर संकट

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे अँकर । कार्यकारी अभियंत्यांना पाठविले पत्र, पाईप लाईनवर १० फूट माती

नरेश येटरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणा : कोरची, चिचगड, देवरी, आमगाव, गोंदिया या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ वरील ४८ गावांना आमगाव दरम्यान बनगाव पाणी पुरवठा योजनेने पाण्याची लाईन जोडली आहे. पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन जमीनीपासून चार फूट खोलवर आहे. मात्र आता राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करताना त्या पाईपलाईनवर आणखी सहा फूट माती टाकली जात असल्यामुळे ही पाईपलाईन जागोजागी फुटत आहे. परिणामी या राष्ट्रीय महामार्गामुळे ४८ गावांतील पाणी पुरवठ्यावर संकट आले आहे.
कोरची, चिचगड, देवरी, आमगाव गोंदिया या रस्त्याचे चौपदरीककरण केले जात आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणामुळे बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बाधीत होत आहे. या योजनेची पाईपलाईनवर चार फूट खोल असताना त्यावर आणखी सहा फूट अतिरीक्त माती व मुरूम टाकले जात आहे. यामुळे पाईपलाईनला गळती सुरू झाली आहे. सदर पाईपलईनची गळती दुरूस्ती करणे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला शक्य होत नसल्याने ४८ गावे व १५ वाड्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचीत राहण्याची वेळ आली आहे. त्यातही पाणी पुरवठा कधी बंद होईल याचा नेम नाही.
सद्यस्थितीत जिल्ह्याचे तापमान ४४ अंशाच्या घरात पोहचले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात या योजनेला धक्काही लागणार नाही असे सर्वेक्षण करताना ठरविण्यात आले होते. तसा अहवालही सोपविण्यात आला होता. परंतु ठरल्या प्रमाणे राष्ट्रीय महामार्गाचे काम केले जात नाही. त्यामुळे या योजनेवर संकट आले असून ४८ गावांतील लोकांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागणार आहे. प्रत्येक गावची पाईपलाईन व गावाला लागून असलेली लाईन दोन ते अडीच मीटर रस्त्यात घेण्यात आली. पाईपलाईनवर असलेले एअर व्हॉल्व, स्कोर व्हॉल्व व स्लुईस व्हॉल्व यावर माती व मुरूम टाकून बुजविण्यात आले आहे. हे बुजविण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणाऱ्यांनी कसलीही सूचना ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाला दिली नाही. या संदर्भात बांधकाम करणाऱ्या यंत्रणेला माहिती देऊनही ते याकडे लक्ष देत नाही. परिणामी व्हॉल्वची कार्यप्रणाली थांबली आहे. त्यामुळे पाईपलाईनवर निर्माण होणारे गळतीचे काम सम दाबाच्या प्रमाणात सर्व गावांना पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही.
८२०५ मीटर पाईपलाईन बुजविली
६०० मिली मीटर व्यासाच्या पी.एस.सी. पाईपलाईनवर संयुक्त पाहणी दरम्यान ठरल्या व्यतिरिक्त माती व मुरूमाचा भरणा करण्यात आलेल्या ठिकाणच्या पाईपलाईनची व्यास, लांबी, पाईप लाईनचा प्रकार याची सर्व माहिती कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग नागपूर यांना पाठविण्यात आली आहे. ६०० मिली मीटर व्यासाची पाईपलाईन राष्ट्रीय महामार्गच्या बांधकामात बुजविण्यात आली. तीची लांबी आठ हजार २०५ मीटर आहे. ही पाईपलाईन बुजविण्यासाठी कुणाची परवानगीच घेतली नाही.
४८ गावातील नागरिक काढणार घागर मोर्चा
राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करताना मुख्य पाईपलाईनवर टाकण्यात आलेली माती त्वरित काढण्यात यावी व तशा सूचना काम करणाºया यंत्रणेला द्याव्यात. अन्यथा ४८ गावे व १५ वाड्यांतील नागरिक पाण्यासाठी घागर मोर्चा काढणार आहेत असा इशारा राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या पत्रात देण्यात आला आहे.

Web Title: Due to the National Highway, 48 villages are facing crisis in water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.