दुर्लक्षपणामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:02 AM2018-07-18T00:02:00+5:302018-07-18T00:03:13+5:30
तालुक्यातील मुरदोली-कोसमतोंडी (खमाटा) या १५ किमी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम डावी कडवी विचारसरणी अंतर्गत नक्षलग्रस्त निधीतून ११ कोेटी रुपये खर्च करुन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : तालुक्यातील मुरदोली-कोसमतोंडी (खमाटा) या १५ किमी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम डावी कडवी विचारसरणी अंतर्गत नक्षलग्रस्त निधीतून ११ कोेटी रुपये खर्च करुन करण्यात आले होते. या रस्त्याची डागडुजी मागील मे महिन्यात करण्यात आली असून पहिल्याच पावसात रस्त्याचे डांबर वाहून गेले. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येथील उपअभियंत्यांच्या देखरेखीत करण्यात आले आहे. कंत्राटदार व अधिकारी यांच्या देखरेखीत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे बोलल्या जाते.
मुरदोली, पांढरी, मुंडीपार (ई), चिचटोला, कोसमतोंडी पर्यंत अनेक ठिगळ लावून चुरी टाकली गेली. परंतु डांबर टाकण्याऐवजी त्यात तेल (आॅईल) टाकण्यात आल्याचे चिचटोला येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मुंडीपार (ई) ते चिचटोला पर्यंत रस्ता चांगला असताना या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. या रस्त्यावर चुरी पसरल्यामुळे वाहन चालवताना त्रास होत आहे. मागील वर्षी अशीच चुरी टाकल्याने चिचटोला-मुंडीपार (ई) या दरम्यान मोटारसायकल स्लीप होऊन दुर्घटना झाली होती. त्यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर एकाला अपंगत्व आले होते.
या रस्त्याची डागडुजी न करता रपटे तयार करणे आवश्यक होते. मात्र अधिकारी डागडुजीच्या नावावर कंत्राटदारामार्फत निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे नागरिक बोलत आहेत. सन २०१०-११ मध्ये या रस्त्याचे काम ११ कोटी रूपये खर्च करुन करण्यात आले. या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता आणि आता डागडुजीच्या कामातही निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. निकृष्ट काम करणाºया कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी चिचटोला येथील उपसरपंच अनिरुध्द बांबोडे आणि माजी उपसरपंच टिकाराम गहाणे यांनी केली आहे.