विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे विद्युत पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 10:40 PM2018-07-09T22:40:56+5:302018-07-09T22:41:24+5:30
वीज वितरण विभागाकडून विद्युत देखभाल दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्युत पुरवठा वांरवार खंडीत होत असल्याने ग्राहकांसह शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : वीज वितरण विभागाकडून विद्युत देखभाल दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्युत पुरवठा वांरवार खंडीत होत असल्याने ग्राहकांसह शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.
विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी वीज वाहून नेणाऱ्या खांबाच्या तारांची देखरेख करीत नसल्यामुळे दररोज विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी तारांना स्पर्श होणाऱ्या झाडांच्या फांद्याची कटाई करण्याचे काम विद्युत विभागाकडून केले जाते. यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करुन दिला जातो. मात्र कामाची जबाबदारी असलेले कर्मचारी आपली जबाबदारी झटकत असल्याने वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्येत मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. वीज पुरवठा सुरळीत व्हावा, या दृष्टीकोणातून विद्युत वाहिन्या तारांची व खांबाची देखरेख करण्याकडे सुध्दा या विभागाचे दुर्लक्ष झाल्याची ओरड ग्राहकांकडून होत आहे. यासंदर्भात माहिती घेतली असता विद्युत वितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने या समस्येत वाढ होत असल्याची बाब पुढे आली आहे. यंदा पावसाळ्याला सुरूवात होवून सुध्दा विद्युत वितरण विभागाने तारांना स्पर्श होणाºया रस्त्यावरील झाडांच्या फांद्याची कटाई केली नाही. परिणामी जोराचा वारा आल्यास वृक्षांच्या फांद्याचा विद्युत तारांना स्पर्श होवून वांरवार विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळेस साप, विंचू व कीडे निघण्याची भीती असते. त्यातच वीेज पुरवठा खंडीत राहत असल्याने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे विद्युत वितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याची दखल घेवून वेळीच उपाय योजना करण्याची मागणी तालुक्यातील वीज ग्राहकांनी केली आहे.
शेतीची कामे प्रभावित
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला सिंचनाच्या सोयीसाठी मोटारपंप लावले आहे. विहीर किंवा बोअरवेलमधून मोटारपंप पाण्याचा उपसा करण्यासाठी विजेची गरज असते. मात्र नेमका याच कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत राहत असल्याने शेतकºयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.