बाघ पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे ‘त्या’ मुलांचा मृत्यू
By admin | Published: June 5, 2017 12:52 AM2017-06-05T00:52:50+5:302017-06-05T00:52:50+5:30
येथील चार ते पाच मुले शनिवार (दि.३) सिरपूर धरणाकडे आंघोळीला गेले असता धरणाच्या समोरच्या टाकीत दोन मुलांचा बुडूृन मृत्यू झाला.
नागरिकांचा आरोप : दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करा
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरपूरबांध : येथील चार ते पाच मुले शनिवार (दि.३) सिरपूर धरणाकडे आंघोळीला गेले असता धरणाच्या समोरच्या टाकीत दोन मुलांचा बुडूृन मृत्यू झाला. ही घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. दिगंबर उर्फ बंटी हेमराज कोसरे व नितेश सुरज कोसरकर अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत. ते दुपारी घरी न आल्यामुळे घरच्या लोकांनी इकडे-तिकडे शोध घेतला. परंतु त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. नंतर त्यांच्या मित्रांना विचारणा केली असता उलट-सुलट माहिती दिली आणि धरणाकडे आंघोळीला गेले असल्याचे म्हटले तेव्हा त्यांचे नातेवाईक आणि गावातील लोकांनी धरणाकडे धाव घेतली. धरणाजवळ सायकल उभी दिसली. धरणाच्या खालच्या टाकीकडे त्यांचे कपडे आढळले. प्रथम दिगंबर हेमराज कोसरे (१४) याचा मृतदेह तरंगत आढळला. नितेश सुरज कोसरकर (१४) याचा पत्ता लागला नव्हता. गावातील मासेमाऱ्यांकडून नितेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. तेव्हा प्रशासनाने गोंदियावरुन गोताखोरांना बोलविले. त्या टाकीत पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला.
दोन मुलांचा जीव गेल्यामुळे लोकांनी बाघ पाटबंधारे विभागावर आक्रोश व्यक्त केला. सिरपुरबांध येथील जलाशयावर दर दिवशी पर्यटक लोक येत असतात. परंतु त्यांच्या सुरक्षेविषयी काहीही उपाययोजना नसल्याकारणाने या ठिकाणी छोट्या-मोठ्या घटना घडतच असतात. या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी हजेरी पटावर हजेरी लावून आपल्या कामाला निघत असतात. त्यांच्या अनुपस्थिती या धरणाची पूर्ण व्यवस्था वाऱ्यावरच असते.
बाघ पाटबंधारे विभागाच्या अभियंता कर्मचाऱ्याचे जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. या ठिकाणी तणावाचे वातावरण असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.संततप्त नागरिकांनी बाघ पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. बाघ पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी घटनेच्या दिवशी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करुन निलंबनाचे लिखीत आश्वासन दिले. शाखा अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांना सुद्धा निलंबीत करण्याची मागणी रेटून धरली. आ. संजय पुराम यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करुन १२ तासाच्या आत उपकार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता यांना निलंबित करण्याची मागणी केली. या ठिकाणी लावण्यात आलेले पथदिवे अनेक दिवसापासून बंद आहेत.