जिल्ह्यात पावसाने मारली दडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 09:08 PM2019-07-14T21:08:56+5:302019-07-14T21:09:32+5:30
मध्यंतरी संततधार बरसलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून अचानक दडी मारली आहे. परिणामी वातावरणात बदल दिसून येत असून उकाडा वाढला आहे. विशेष म्हणजे, पावसाने दडी मारल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १३८ मीमी पावसाची तूट दिसून येत असून हा फरक वाढतच चालला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मध्यंतरी संततधार बरसलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून अचानक दडी मारली आहे. परिणामी वातावरणात बदल दिसून येत असून उकाडा वाढला आहे. विशेष म्हणजे, पावसाने दडी मारल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १३८ मीमी पावसाची तूट दिसून येत असून हा फरक वाढतच चालला आहे.
यंदा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने चांगला जोर दाखविला. दमदार पावसामुळे जिल्हा पाणीदार झाला व वातावरण ही गार झाले होते. दररोज हजेरी लावत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील पर्जन्याला अपेक्षित सरासरी गाठली जाणार असल्याचे दिसत होते. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पाऊस बरसत नसून त्यात उन्ह तापत असल्याने वातावरण बदलले व उकाडा वाढला आहे. परिणामी सुरूवातीपासूनच अपेक्षित पावसाची आकडेवारी गाठता आलेली नाही.
पावसाने दडी मारल्याने प्रामुख्याने शेतकरी चिंतेत अडकला आहे. पाऊस बरसत असल्याने जोमाने शेतीच्या कामाला लागलेला शेतकरी आता पुन्हा आकाशाकडे बघत बसला आहे.
जिल्ह्यातील पर्जन्यमान बघता १२ जुलैपर्यंत ३८२.७२ मीमी सरासरी पाऊस बरसने अपेक्षित असतानाच आतापर्यंत २४४.७९ मीमी सरासरी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. म्हणजेच, आजही १३८ मीमी सरासरी पावसाची तूट कायम आहे. त्यात आता दिवस वाढत चालल्याने ही तूट अधिकच वाढत चालली आहे.
रोवणी अडकणार
संततधार बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी जोमाने कामाला लागला होता. त्यात कित्येकांनी रोवणी आटोपली किंवा सुरू केली आहे. तर कित्येकांची रोवणी अद्यापही झालेली नाही. त्यात आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने रोवणी अडकणार असल्याचे बोलले जात आहे. एकंदर पावसाच्या खेळीमुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेच्या सावटात अडकला आहे. दमदार व संततधार पावसासाठी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असतानाच सर्वांच्या व स्वत:च्या पोटासाठी घाम गाळणारा शेतकरी मात्र डोळ््यात पाणी आणून पाण्याची वाट बघत आहे.