रस्त्याअभावी पाईपमधून सुरु आहे ये-जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:03 PM2019-06-04T22:03:43+5:302019-06-04T22:04:12+5:30
केंद्र आणि राज्य सरकार प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवून ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे तयार करीत आहे. ग्रामीण रस्त्यांना शहरी रस्त्यांशी जोडून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : केंद्र आणि राज्य सरकार प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवून ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे तयार करीत आहे. ग्रामीण रस्त्यांना शहरी रस्त्यांशी जोडून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले जात आहे. मात्र दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षीत आणि वेळकाढू धोरणामुळे तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील एका कुटुंबाला मागील महिनाभरापासून पाईपमधून ये-जा करावी लागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्राप्त माहितीनुसार धापेवाडा उपसासिंचन प्रकल्प टप्पा २ अंतर्गत वैनगंगा नदीचे पाणी चोरखमारा जलाशयात टाकण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता पाईप लाईन बसविण्याचे काम सुरु आहे. हे काम करताना मात्र वडेगाव येथील नागरिकांच्या जीवीताकडे दुर्लक्ष करुन काम केले जात आहे.
स्थानिक भिवरामजी विद्यालय समोरील भागात नितीन लांजेवार यांचे घरासमोर पाईप लाईन करिता नाली खोदकाम करण्यात आले. तर नाली १५ फुट खोल व १५ फुट रूंद आहे. या नालीमुळे कुटुंबीयांच्या घरी ये-जा करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता म्हणून काम करणाऱ्या कंपनीतर्फे घरासमोर नालीवर आडवा पाईप टाकण्यात आला आहे.
सद्यस्थितीत लांजेवार कुटुंबीय मागील महिनाभरापासून त्या पाईप मधून ये-जा करीत आहे. मात्र पाईपमधून अधिक काळ जाणे-येणे करणे धोक्याचे असून जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लांजेवार कुटुंबीयांनी अनेकदा सदर कंपनीकडे रस्त्याबाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीचे उत्तर देऊन याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत कंपनीच्या स्थानिक पर्यवेक्षकांकडे विचारणा केली असता अनेक कामे शिल्लक असल्यामुळे सध्या काही करता येणार नसल्याचे सांगितले.
कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मुरगन यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन घरी जाण्या येण्याचा मार्ग मोकळा करुन दयावा अशी मागणी नितीन लांजेवार व कुटुुंबीयांनी केली आहे.