सातबाऱ्यावरील तांत्रिक अडचणींमुळे धान खरेदी प्रक्रिया रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 05:00 AM2020-11-08T05:00:00+5:302020-11-08T05:00:22+5:30
धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करताना केंद्रास जोडलेल्या गावाच्या यादीनुसारच धानाची खरेदी करावी. धान खरेदी करताना शेतकऱ्यांनी त्या हंगामाचा पिकपेरा असलेल्या सातबाराचा उतारा मुळप्रत (डिजीटल स्वाक्षरीचे व त्यावर धानाखाली लागवड क्षेत्रफळ नमूद आहे असा), आधारकार्ड झेरॉक्स व बँक खाते पासबुक झेरॉक्स घेवून धान खरेदी केंद्रावर आणावे अशा अनेक अटी टाकलेल्या आहेत. सध्या जिल्ह्यात विविध सेतू केंद्रामार्फत वा कम्प्युटर कॅफेतून निघणाऱ्या सातबाऱ्यांवर २०१८-१९ या हंगामाचाच पीक पेरा नोंदविलेला आहे.
n लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीत पारदर्शकता यावी व शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाच्या खेटऱ्या मारण्यापासून मुक्तता मिळावी या हेतूने घातलेली डिजिटल स्वाक्षरीत सातबाऱ्याची अट आता धान खरेदीत अडथळा निर्माण करीत असून जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रिया रखडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, जिल्हा पणन अधिकारी गोंदिया या कार्यालयाकडून जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांना ५ दिवसांच्या आत धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी निर्देश देण्यात आले असून शेतकऱ्यांकरीता अनेक मार्गदर्शक सूचना निर्गमीत केलेल्या आहेत. धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करताना केंद्रास जोडलेल्या गावाच्या यादीनुसारच धानाची खरेदी करावी. धान खरेदी करताना शेतकऱ्यांनी त्या हंगामाचा पिकपेरा असलेल्या सातबाराचा उतारा मुळप्रत (डिजीटल स्वाक्षरीचे व त्यावर धानाखाली लागवड क्षेत्रफळ नमूद आहे असा), आधारकार्ड झेरॉक्स व बँक खाते पासबुक झेरॉक्स घेवून धान खरेदी केंद्रावर आणावे अशा अनेक अटी टाकलेल्या आहेत. सध्या जिल्ह्यात विविध सेतू केंद्रामार्फत वा कम्प्युटर कॅफेतून निघणाऱ्या सातबाऱ्यांवर २०१८-१९ या हंगामाचाच पीक पेरा नोंदविलेला आहे.
सातबाऱ्यावर चालू हंगाम म्हणजे २०२०-२१ चा पीक पेरा नमूद असणे आवश्यक आहे. परंतु सेतू केंद्रातून कालबाह्य डिजिटल सातबारा मिळत असल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा तलाठी कार्यालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. सदर पीक पेरा अद्ययावत करण्यातील पहिली अडचण म्हणजे जिल्ह्यातील तलाठी संघटनेमार्फत विविध मागण्यांसाठी ९ नोव्हेंबर पासून असहकार आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यामुळे तलाठी कार्यालय बंद असणार असून तलाठ्यांना सर्व सातबारे एकाचवेळी अद्ययावत न करता प्रत्येक सातबाऱ्याचा पीक पेरा एक-एक करून अद्ययावत करावा लागणार आहे. दुसरी बाब म्हणजे, जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी तलाठी स्वाक्षरीत सातबाऱ्याऐवजी डिजिटल स्वाक्षरी धान खरेदी केंद्रावर देण्याची अट घातली आहे. यामुळे सातबाऱ्यावरील तांत्रीक बाब शेतकऱ्यांसाठी सोयीऐवजी त्यांची अडचण ठरत आहे.
भंडाऱ्यात डिजिटल सातबाऱ्याची अट शिथिल
सातबाऱ्यावरील चालू पीक पेरा नोंदविण्याची प्रक्रिया ही लांबलचक असून पीक पेरा अद्ययावत होईपर्यंत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबाऱ्याची अट पणन अधिकारी भंडारा यांनी शिथिल केली आहे. धान खरेदी केंद्रावर तलाठी हस्तलिखित अद्ययावत पीक पेरायुक्त सातबारे स्वीकारण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यात सुद्धा डिजिटल सातबाऱ्याची अट शिथिल करून हस्तलिखित सातबारे स्वीकारण्यास मुभा देण्याची मागणी गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी व धान खरेदी केंद्रांनी केली आहे.
पीक पेरा अद्ययावत करण्यात येईल
डिजिटल सातबाऱ्यावरील २०२०-२१ या चालू हंगामाचा पीक पेरा अद्ययावत करण्याविषयी तलाठ्यांना सूचना देण्यात आली आहे. लवकरच चालू पिकपेरायुक्त डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारे उपलब्ध करण्यात येतील.
- प्रशांत घोरुडे, तहसीलदार तिरोडा
मागणी पूर्ण झाल्यावर आंदोलन मागे घेणार
गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत पीक पेरायुक्त डिजिटल सातबाराऱ्याची गरज असतानाच तलाठी संघटनेने असहकार आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांचेवर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी व तलाठयांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले असून मागण्या मान्य झाल्यावरच आंदोलन मागे घेण्यात येईल.
- एम टी मलेवार,
जिल्हाध्यक्ष, तलाठी संघटना गोंदिया