प्रेम प्रकरणातून एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर ताणला देशीकट्टा, घटनेमुळे खळबळ
By अंकुश गुंडावार | Published: September 2, 2022 03:48 PM2022-09-02T15:48:57+5:302022-09-02T15:53:17+5:30
दासगाव येथील घटना : देशीकट्टा आला कुठून? गावकऱ्यांमध्ये खळबळ
रावणवाडी (गोंदिया) : प्रेम प्रकरणातून एका विद्यार्थ्यांने दुसऱ्या विद्यार्थ्यावर देशीकट्टा ताणल्याची घटना शुक्रवारी (दि.२) सकाळच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील दासगाव येथील राणी अवंतीबाई चौक येथे घडली. दरम्यान घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून त्या विद्यार्थ्यांकडे देशीकट्टा आला कुठून याचीच चर्चा आहे.
प्राप्त माहितीनुसार दासगाव येथे शाळा महाविद्यालय असून अकाराव्या वर्गात शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये शुक्रवारी सकाळी ८ वाजता सुमारास राणी अवंतीबाई चौकात वाद झाला. हा वाद नेमका कशावरुन झाला हे समजण्यास उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना मार्ग नव्हता. दरम्यान सोनबिरी येथील एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर देशी कट्टा ताणला. दरम्यान याप्रकाराने उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये थोड्यावेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान याप्रकरणाची अद्यापही रावणवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपसी तडजोड करुन वाद मिटविल्याची माहिती आहे. तसेच झालेल्या वादात देशी कट्टा काढल्याचे वृत्तदेखील खाेटे असल्याचे सांगितले. तर, दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद हा प्रेमप्रकरणातून झाल्याचे बोलल्या जाते.
यासंदर्भात दासगाव बीटचे अमंलदार पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी शुक्रवारी सकाळी दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला. मात्र, यापैकी एका विद्यार्थ्याजवळ देशी कट्टा होता की नाही हे माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान दोन्ही विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासासाठी रावणवाडी पोलीस स्टेशन येथे येण्यास सांगितले असल्याची माहिती दिली.