हक्काच्या निवाऱ्यासाठी 'त्या' कुटुंबीयांचा संघर्ष कायम, शासन-प्रशासन दखल घेईना !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 02:29 PM2023-05-25T14:29:55+5:302023-05-25T16:07:54+5:30

भर पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ

Due to the airport at Birsi in Gondia taluka, the issue of resettlement of the encroached citizens has not yet been resolved | हक्काच्या निवाऱ्यासाठी 'त्या' कुटुंबीयांचा संघर्ष कायम, शासन-प्रशासन दखल घेईना !

हक्काच्या निवाऱ्यासाठी 'त्या' कुटुंबीयांचा संघर्ष कायम, शासन-प्रशासन दखल घेईना !

googlenewsNext

विजेंद्र मेश्राम

खातिया (गोंदिया) :गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळामुळे अतिक्रमण हटविण्यात आलेल्या नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागला नसल्याने या कुटुंबीयांना भर पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. हक्काच्या निवाऱ्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा ना शासन, ना प्रशासन दखल घेत असल्याने प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष कायम आहे.

गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळासाठी विमानतळ प्राधिकरणाने येथील अतिक्रमण २०२१ मध्ये काढले होते. यामुळे या परिसरात मागील २० ते २५ वर्षांपासून पक्के घर बांधून राहणाऱ्या कुटुंबांचे पक्के घरे पाडण्यात आल्याने त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कुटुंबांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून न दिल्याने त्यांनी बिरसी येथील ग्रामपंचायतच्या मोकळ्या जागेवर झोपड्या बांधून वास्तव्य करण्यास सुरुवात केली. बेघर झालेल्या कुटुंबीयांनी घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले. पण त्यांची अद्यापही कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून या कुटुंबांचा निवाऱ्यासाठी संघर्ष कायम आहे. परिणामी या कुटुंबांना तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या झोपड्यांमध्ये ऊन, वारा व पावसाचा मारा सहन करीत दिवस काढावे लागत आहे. पण लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला या कुटुंबीयांच्या समस्येची जाणीव झाली नाही.

आमचा वाली कोणीच नाही

विमानतळ प्राधिकरणाने आमचे अतिक्रमण हटविल्यानंतर घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी म्हणून खा. सुनील मेंढे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींना अनेकदा त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला. पण कुणीच याची दखल घेतली नाही. त्यामुळे गोरगरीब कुटुंबीयांचा कुणीच वाली नसल्याची भावना या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

ग्रामपंचायतने केला पाठपुरावा

बिरसी येथील ग्रामपंचायतच्यावतीने अनेकदा या अतिक्रमणबाधित कुटुंबीयांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, म्हणून शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. पण याची कुणीच दखल घेतली नाही. त्यामुळे या कुटुंबीयांचा प्रश्न कायम आहे.

- उमेशसिंह रामप्रसादसिंह पंडेले, उपसरपंच ग्रामपंचायत बिरसी

Web Title: Due to the airport at Birsi in Gondia taluka, the issue of resettlement of the encroached citizens has not yet been resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.