दोनदा अर्ज करूनही घरकूल योजनेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 10:00 PM2017-09-12T22:00:31+5:302017-09-12T22:00:31+5:30
घोगरा येथील वृद्ध नागरिक शालीक दयाराम बोरघरे (६०) हे दारिद्रयरेषेखाली असून त्यांचे घर पडक्या अवस्थेत आहे. जीव मुठीत घेवून जगत असताना त्यांनी घरकुलासाठी अर्ज केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंडीकोटा : घोगरा येथील वृद्ध नागरिक शालीक दयाराम बोरघरे (६०) हे दारिद्रयरेषेखाली असून त्यांचे घर पडक्या अवस्थेत आहे. जीव मुठीत घेवून जगत असताना त्यांनी घरकुलासाठी अर्ज केला. मात्र त्यांचा रितसर दिलेला अर्ज बेपत्ता झाला आहे. त्याबाबत सरपंच व सचिवांना विचारणा केल्यावर ते टाळटाळीचे उत्तरे देत आहेत.
शालीक बोरघरे यांच्या आईवडिलांचा मृत्यू झालेला आहे. सध्या त्यांच्या कुटुंबात दोन मुले व पत्नी असून घर पडक्या स्थितीत आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय तुमसरला जाऊन भाचाच्या घरी राहतात व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. गावातील घरी शालीक फक्त एकटेच असून आपला जीव मुठीत घेवून मोडक्या झोपडीत राहत आहेत. बोरघरे मोलमजुरी करुन आपले जीवन जगत आहेत. त्यांनी दोनदा घोगरा ग्रामपंचायतच्या आमसभेत रितसर अर्ज केला होता. मात्र दिलेले अर्ज कुठे गायब झाले, पत्ताच नाही. सरपंच, सचिव यांना विचारपूस केल्यास नेहमीच टाळाटाळीचे उत्तरे देतात. जोरदार पाऊस आल्यावर त्या झोपडीत राहणे त्यांना कठीण होते. त्यामुळे त्यांना संपूर्ण रात्र जागूनच काढावी लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून हे जीर्ण झालेले घर केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित अधिकाºयांनी चौकशी करुन त्यांना घरकूल मंजूर करावे, अशी मागणी होत आहे.