सडक-अर्जुनीत भीषण पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 09:55 PM2018-04-27T21:55:56+5:302018-04-27T21:55:56+5:30

मागील वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे नद्या, नाले, तलाव, बोड्यांमध्ये पाणी साचले नाही. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेलमधून पाणी येत नाही.

Due to water shortage in road-Arjunite | सडक-अर्जुनीत भीषण पाणी टंचाई

सडक-अर्जुनीत भीषण पाणी टंचाई

Next
ठळक मुद्देनगर पंचायतने लक्ष द्यावे : बहुजन रिपब्लिकन पक्षाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोयलारी) : मागील वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे नद्या, नाले, तलाव, बोड्यांमध्ये पाणी साचले नाही. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेलमधून पाणी येत नाही. त्यामुळे सडक अर्जुनी नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र.५ मध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. परिणामीे पाण्यासाठी सकाळपासूनच महिलांची भटकंती सुरू आहे. यासाठी बहुजन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पाण्याव्यतिरिक्त इतरही मागण्यांचे निवेदन प्रभारी मुख्याधिकारी अखिलकुमार मेश्राम यांना दिले आहे.
उन्हाळ्याला सुरुवात होवून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. अशातच वॉर्ड क्र. ५ मधील रहिवाशांचे पाण्यासाठी बेहाल होत आहे. सर्वांना शुद्ध व पुरेशा पाण्याचा पुरवठा करणे ही नगर पंचायतची नैतिक जबाबदारी आहे. मात्र नगर पंचायतच्या भोंगळ कारभाराने प्रचलित असलेल्या नगर पंचायतच्या पदाधिकाऱ्यांना जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचा आरोप आहे. याचेच उदाहरण म्हणजे येथील वॉर्ड क्र. ५ मधील महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पिण्याच्या पाण्याची सोय करणे नगर पंचायतची जबाबदारी आहे. जर पिण्याच्या पाण्याची उपाययोजना केली असती तर वॉर्ड क्र. ५ मध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली नसती.
याच वॉर्डातील काही लोकांनी टिल्लू पंप लावला आहे. त्यामुळे काही लोकांना पाणी मिळते तर काही लोक पाण्यापासून वंचित आहेत. ज्या लोकांनी टिल्लू पंपाचा वापर करुन इतरांना पाण्यापासून वंचित ठेवले आहे. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
मात्र नगर पंचायतचे पदाधिकारी मंूग गिळून गप्प का? असा सवाल निर्माण होत आहे. नगर पंचायतने या भीषण समस्येकडे जातीने लक्ष घालून सर्वांसाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी आहे. या मागणीसह इतरही मागण्यांचा निवेदनात समावेश असून बहुजन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार अखिलेशकुमार मेश्राम यांना निवेदन देण्यात आले.
सदर मागण्या एका आठवड्यात पूर्ण कराव्या अन्यथा नगरपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी बीआरएसपीचे तालुकाध्यक्ष महेंद्र तागडे, महासचिव दिनेश ईलमकर, हिवराज अंबादे, जाधव अंबादे, प्रल्हाद बडोले, देवचंद टेंभुर्णे, धनलाल अंबादे, गीता अंबादे, वर्षा अंबादे, निरंजना अंबादे, लिला अंबादे, भगवान मांढरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वीज पुरवठा सुरळीत करा
शहरात वीज पुरवठा नेहमी खंडित होत असते. अशातच शाळकरी विद्यार्थ्यांना अभ्यास करतेवेळी नाहक त्रास होतो. तसेच उन्हाळ्यात स्वत:च्या बचावासाठी घरोघरी कुलर, पंखे आहेत. परंतु विजेच्या लपंडावाने त्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. नियमित वीज पुरवठा होईल, त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.
बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सौंदर्यीकरण करा
जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेसमोर अनेक वर्षांपासून घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. राष्ट्रीय सणानिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले जाते. मात्र पायऱ्यांची सोय नसल्याने पाहुण्यांना माल्यार्पण करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. एवढेच नाही तर माल्यार्पण करतेवेळी पाहुणे खाली कोसळण्याची भीती नाकारता येत नाही. त्यासाठी सिमेंट कांक्रिटच्या पायऱ्या तयार कराव्यात. तसेच बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या डोक्यावर छत्रीची व्यवस्था करण्याची मागणी केली.

Web Title: Due to water shortage in road-Arjunite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.