घरफोडी करताना सीसीटीव्हीत चोरटा दिसला अन् हाती लागला
By नरेश रहिले | Published: March 30, 2024 06:51 PM2024-03-30T18:51:01+5:302024-03-30T18:51:34+5:30
शहर पोलिसांची कामगिरी : चोरलेले दागिने केले हस्तगत
गोंदिया : शहरातील गौतमनगर परिसरातील कायरकल लॉन परिसरात रविवारी (दि.२४) एका घरातून चोरट्याने ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. मात्र सीसीटीव्हीत तो चोरटा दिसला व पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडले. गौतमनगर परिसरातील कायरकर लॉन समोरील रहिवासी दिनेश पूरनलाल मेश्राम हे रविवारी (दि.२४) बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घराच्या समोरील लोखंडी गेट व समोरील दाराचे कुलूप तोडून आलमारीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरण्यात आला होता.
या घटनेसंदर्भात शहर पोलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाने सुरू केला असता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा दिसून आला. याबाबत पथकाने आणखी माहिती गोळा करून त्या आधारे आरोपीचा शोध घेतला व आरोपी फरहान ईशाक कुरेशी (१९, रा.गौतमनगर, बाजपेई वाॅर्ड) याला ताब्यात घेतले. विचारपूस केली असता त्यांना आपला गुन्हा कबूल केला. तर पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले दागिने सोन्याची नथ, लॉकेट, सोन्याची अंगठी असे २८ हजार रुपये किमतीचे दागिने व आठ हजार रुपये रोख असा ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस निरीक्षक सूर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम, हवालदार कवलपालसिंग भाटीया, जागेश्वर उईके, दीपक रहांगडाले, सुदेश टेंभरे, सतीश शेंडे, प्रमोद चौहाण, निशिकांत लोंदासे, महिला पोलिस हवालदार रिना चौहाण, शिपाई दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रावते, कुणाल बारेवार यांनी केली आहे.