पितृ पंधरवड्यात नैवेद्य शिवण्यासाठी कावळे दिसेनात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 03:44 PM2024-09-27T15:44:53+5:302024-09-27T15:46:42+5:30
टाकलेला घास तसाच पडून : काक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पितृ पंधरवडा म्हटले की या पंधरा दिवसांत पितरांना जेवू घालण्याची लगबग असते. पितरांसाठी केलेल्या नैवेद्याला काकस्पर्श होणे या दिवसांत महत्त्वाचे मानले जाते. मात्र, शहरात अनेकदा नैवेद्याला कावळा शिवत नसल्याने काकस्पर्शासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. काक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून, जेवणावळींनाही घरघर लागली आहे. पितृ पंधरवड्यात काकस्पर्शाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याशिवाय पितर म्हणून जेवू घालणाऱ्या व्यक्तीलाही तितकेच महत्त्व आहे. पूर्वी पितर म्हटले की भल्या पहाटेपासून पितराचा स्वयंपाक बनविण्यासाठी घरातील स्त्रियांची लगबग असे. घरोघरी दिवसभर जेवणावळी सुरू असत. परंतु, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आता हे चित्र बदलले आहे.
वातावरणातील बदलांचा फटका
सध्या वातावरणातील बदलांमुळे कावळ्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. वृक्षतोड, नष्ट होणारे नैसर्गिक पाणवठे, पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप, पर्या- वरणातील बदल अशा अनेक गोष्टी त्यासाठी कारणीभूत आहेत. पक्षिमित्र, पक्षिनिरीक्षक बऱ्याचदा याबाबत चिंता व्यक्त करीत आहेत. अन्य पक्ष्यांसह कावळ्यांचीही संख्या काही भागांत घटलेली पाहायला मिळते.
जीवनसाखळीत बाधा येण्याचा धोका
मनुष्य निसर्गात फेकत असलेले रेडिमेड खाद्य पक्ष्यांना मिळू लागल्याने नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊन प्रजाती नष्ट होत आहेत. जीवनसाखळी तुटण्याचा धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे. पर्यावरणासाठी ही चिंतेची बाब असल्याचे पर्यावरणप्रेमी रूपेश निबार्ते यांनी सांगितले.