खोलीकरण व वेस्टवेअर बांधकामात गैरप्रकार
By admin | Published: July 11, 2017 12:46 AM2017-07-11T00:46:06+5:302017-07-11T00:46:06+5:30
सुरगाव-चापटी येथील माजी मालगुजारी तलावातील गाळ काढून खोलीकरण करणे व वेस्टवेअरच्या पाळीचे बांधकाम नियमांना डावलून होत आहे.
गावकऱ्यांनी बंद पाडले काम : जि.प.सदस्यांची चौकशीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : सुरगाव-चापटी येथील माजी मालगुजारी तलावातील गाळ काढून खोलीकरण करणे व वेस्टवेअरच्या पाळीचे बांधकाम नियमांना डावलून होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी हे काम बंद पाडले. तर या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा परिषद सदस्य गिरीष पालीवाल यांनी या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सुरगाव-चापटी येथील दोनशे एकराच्या परिसरात व्यापलेला मोठा माजी मालगुजार तलाव आहे. सदर तलावापासून चापटी येथील समस्त शेतकऱ्यांच्या २५० ते ३०० एकर शेतजमिनीला बारमाही ओलिताची सोय होते. लघु पाटबंधारे उपविभागाच्यावतीने तलावाच्या दुरुस्तीचे काम वेळोवेळी करण्यात येते. तलावाचा वेस्टवेअर जमिनीच्या स्तरापासून ५ फूट उंच असल्याचे गावातील शेतकऱ्यांचे म्हणने आहे. ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत सदर तलावाचे खोलीकरण करुन गाळ काढणे व वेस्टवेअर तसेच तुकूमाचे नव्याने बांधकाम करण्याचे काम ई-टेंडर पद्धतीने एका कंत्राटदाराला दिल्याचे सांगण्यात आले.
खोलीकरण करताना निघालेला गाळ तलावाच्या पोटात न टाकता तलावाच्या पाळीच्या मागच्या बाजूला टाकण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा गाळ तलावाच्या आतमध्येच टाकण्यात आल्याचे प्रत्यक्षात पाहणी दरम्यान दिसून येत आहे.
तलावाचे पाणी लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी पाळीच्या शेवटच्या दोन्ही बाजूला दोन तुकूम असताना, संबंधित कंत्राटदाराने मधोमध पाळ फोडून पाणी जाण्याचा मार्ग बनविण्याचा प्रयत्न केला. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्या कामाला विरोध झाल्याने अर्धवट फोडलेली पाळ पुन्हा बांधण्याचा प्रकार कंत्राटदाराने केला.
कंत्राटदाराच्या मनमर्जी कामाला लगाम घालण्याचे काम संबंधित अधिकारी करु शकले नाही. जे पूर्वीचे दोन तुकूम होेते, तेच कायम ठेवून डागडुजी करुन नवीनीकरण केल्याचा प्रताप झाल्याचे दिसून येत आहे. तलावाचा वेस्टवेअरची पूर्वीची उंची ५ फूट होती. नव्याने बांधण्यात येत असलेला वेस्टवेअर जमिनीच्या समतल आहे. तो ३ फूट उंचीचा करावा, असा आग्रह गावातील शेतकऱ्यांनी केला. परंतु कंत्राटदार उंची वाढविण्यास तयार न झाल्याने अखेर गावकऱ्यांनी वेस्टवेअर बांधकामच बंद पाडले .
तलाव खोलीकरण व वेस्टवेअरच्या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी उपविभागीय अभियंता घरतकर यांची गुरुवारी प्रत्यक्ष भेट घेऊन चापटी येथील शेतकऱ्यांनी केली. मात्र संबंधितांनी तात्काळ दखल न घेतल्याने गावकऱ्यांनीच तीव्र भूमिका घेऊन काम बंद पाडले.
पालीवाल यांनी
केली पाहणी
जि.प.सदस्य गिरीष पालीवाल यांच्या क्षेत्रातील चापटी हे गाव असल्याने गावकऱ्यांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. यावर त्यांनी गावकऱ्यांसह झालेल्या कामाचे निरीक्षण केले. याप्रसंगी तलावातून काढलेला गाळ तलावाच्या पोटात जमा असलेला दिसला. वेस्टवेअर जमिनीलगत बांधकाम झाल्याचे दिसले. सदर बांधकाम संशयास्पद असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना कामासंबंधी जाब विचारुन तलाव खोलीकरण व वेस्टवेअर बांधकामाची योग्य चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.