तृतीयपंथीयांचा ‘धर्म’ पाळत नसल्यामुळे बदनाम
By admin | Published: April 6, 2016 01:53 AM2016-04-06T01:53:57+5:302016-04-06T01:53:57+5:30
ईश्वराने आम्हाला जसे बनवले तसेच आम्हाला राहावे लागणार आहे. त्यात बदल करण्याचा आम्हाला अधिकार नाही.
पिंकीची खंत : लोकांना त्रास देणे हे नियमबाह्य
गोंदिया : ईश्वराने आम्हाला जसे बनवले तसेच आम्हाला राहावे लागणार आहे. त्यात बदल करण्याचा आम्हाला अधिकार नाही. यात आमचा काही दोष नसला तरी समाजाची आमच्याकडे पाहण्याची भावना हीन असते. यासाठी आमच्याच बिरादरीतील काही लोक कारणीभूत आहेत. पैशासाठी लोकांना जोरजबरदस्ती करणे आमच्या धर्मात बसत नाही. तरीही ज्या पद्धतीने काही लोक गैरवर्तन करतात त्यामुळे आमच्याबद्दल लोकांची तशी भावना निर्माण होते, अशी खंत पटना (बिहार) येथून आलेल्या आणि सध्या गोंदियात वास्तव्यास असलेल्या ‘पिंकी’ या तृतीयपंथीने व्यक्त केली.
‘लोकमत’ कार्यालयात येऊन दिलेल्या मुलाखतीत पिंकीने अनेक प्रश्नांमधून तृतीयपंथीयांचे भावविश्व उलगडले. त्यांच्याबद्दल समाजात असलेली समज आणि वस्तुस्थितीही सांगितली. कुण्या साधुसंताच्या प्रबोधनातून प्रेरित होऊन रंजल्या, गांजल्यांची सेवा करणारे बहुतांश मिळतात. परंतु समाजाने हिणवलेल्या तृतीयपंथीने कमाईतील काही हिस्सा रंजल्या, गांजल्याच्या सेवेसाठी खर्च करणे म्हणजे त्यागी वृत्तीच्या महापुरूषाच्या बरोबरीतील कार्य आहे. हे कार्य मागील आठ वर्षापासून तृतीयपंथी म्हणून समाजात वावरत असलेल्या पिंकीने सुरू केले आहे.
बिहारच्या मुज्जफरपूर जिल्हातील रामपूरी हरी येथील मूळचा रहिवासी उदय यादव नावाचा मुलगा आठ वर्षापूर्वी तृतीयपंथीयांच्या रांगेत आला. त्याने तृतीयपंथी म्हणून समाजात वावरतांना स्वत:चे बदलले व समाजात पिंकी या नावाने वावरत आहे. पिंकीने कमावलेल्या पैशांतून काही हिस्सा आपल्या गुरूंना भेट देऊन काही पैसा रंजल्या गांजल्या लोकांच्या मदतीसाठी देण्याचे काम हाती घेतले. १० वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या या तृतीयपंथीने अकरावीत प्रवेश घेताच घर सोडले. परंतु अधामधात घरी जाऊन आई-वडील, बहीण व भावांना आर्थिक मदत ती करीत आहे.
या पिंकीने गोंदियातील कन्हयामौसी या तृतीयपंथीला आपला गुरू मानला आहे. पिंकी रेल्वे गाड्यांमध्ये जाऊन लोकांना आशिर्वाद देत लोकांकडून मिळालेल्या मदतीतून स्वत:चा उदरनिर्वाह व आपल्या गुरूला मदत करते. समाजात वावरत असताना बेवारस मुलांच्या संगोपनासाठी, अडचणीत सापलेल्यांना, गरीब मुलींच्या लग्नासाठी मदत करण्याचे कामही ती करीत आहे.
दररोज कमावित असलेल्या पैशांतून पिंकीने वाहन घेतले असून ते वाहनही भाड्याने चालविण्यास माणूस ठेवला आहे. समाजातील दुर्बलांना मदत करण्याची पिंकीची तळमळ इतर किन्नरांना प्रेरणादायी ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पिंकीचे नागपूरच्या तरुणाशी लग्न
पिंकी बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड व महाराष्ट्र या राज्यात राहिली. परंतु महागाईच्या दृष्टीने महाराष्ट्र पुढे असल्याचे तिचे म्हणणे आहे. आपण नागपूरमध्ये रेल्वेत तृतीयपंथी म्हणून वावरत असताना एक दिवस कॉलेजमध्ये जाणारा तरूण मिळाला. त्याला पिंकीने आशीर्वादाचे पैसे मागितले. परंतु आपल्याकडे पैसे नाही, दहा रूपये तूच मला दे असे त्या तरूणाने पिंकीला म्हटले. पिंकीने त्याला त्याच वेळी शंभर रूपये दिले. त्यानंतर त्या तरूणाने पिंकीशी चांगली दोस्ती केली. त्यातूनच त्याने तिच्याशी लग्न करण्याचा चंग बांधला. मुस्लीम समाजातील तरूणाशी लग्न करणारी पिंकी सासरी आठ दिवस राहिली. परंतु सासू तिला घराबाहेर पडू देत नव्हती. रेल्वेगाडीत सतत गर्दीत राहणाऱ्या पिंकीला कुचंबणा वाटल्याने तिने आपल्या गुरूला सांगून जुना व्यवसाय करण्याचे ठरविले. ज्या मुलाशी लग्न केले त्याला शिक्षणासाठी दिल्लीला पाठविले असून त्याचा खर्च आपण सांभाळत असल्याचे पिंकीने सांगितले. त्याचे शिक्षण झाल्यावर गरीब घरातील सुंदर मुलीशी आपण त्याचे लग्न लावून देणार असल्याचा मनोदय पिंकीने व्यक्त केला.
समाजात सन्मानाने वागावे
बहुतांशवेळी किन्नरांनी लोकांची फजिती केली अशा वाईट बातम्या ऐकायला येतात, ते योग्य नाही. आम्हचे हात समाजातील लोकांना आशिर्वाद देण्यासाठी आहेत. प्रवासात महिलांसोबत पुरुष मंडळीही प्रवास करतात. पुरूषांनी पैसे दिले नाही तर काही तृतीयपंथी मारहाण करणे, कपडे काढणे व अश्लील कृत्य करण्याचे काम करतात, हे योग्य नाही. असे कृत्य न करता तृतीयपंथीनी समाजात सन्मानाने वागावे, असाही संदेश पिंकीने इतर तृतीयपंथी यांना दिला आहे.