तलाठ्याकडूनच भरावी ई- पीक पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:34 AM2021-09-14T04:34:17+5:302021-09-14T04:34:17+5:30

गोंदिया : सध्या शासनाकडून शेतकऱ्यांसाठी वरदान असलेला ई- पीक पाहणी हा प्रकल्प युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे. मात्र, या ...

E-crop survey should be done from Talatha itself | तलाठ्याकडूनच भरावी ई- पीक पाहणी

तलाठ्याकडूनच भरावी ई- पीक पाहणी

googlenewsNext

गोंदिया : सध्या शासनाकडून शेतकऱ्यांसाठी वरदान असलेला ई- पीक पाहणी हा प्रकल्प युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे. मात्र, या प्रकल्पांतर्गत मोबाइल ॲपमध्ये माहिती अपलोड करताना शेतकऱ्यांना मोठी अडचण येत आहे. त्यामुळे अपलोडची कामे ही तलाठ्याकडूनच करवून घेण्यात यावीत, अशी मागणी तालुक्यातील ग्राम टेमनी येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

शेतकऱ्यांना विविध योजनांचा सरळ लाभ पुरविण्यासाठी शासनाने त्यांच्या शेतातील लागवड केलेल्या पिकांची माहिती शासन दरबारी उपलब्ध व्हावी म्हणून ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकांची माहिती मोबाइल ॲपच्या माध्यमातून अपलोड करणे गरजेचे आहे. मात्र, हे करीत असताना अनेक शेतकऱ्यांना मोठी अडचण येत आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड फोन नसल्यामुळे त्यांना नोंदणी कशी करावी, असा प्रश्न पडला आहे. त्यातच अनेक गावांत मोबाइल नेटवर्कची मोठी समस्या आहे. त्यामुळे माहिती अपलोड करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याव्यतिरिक्त अनेक कुटुंबातील सातबारा एकत्र आहे; परंतु जमिनीची आपसात कौटुंबिक हिस्से वाटणी झाली आहे. त्यामुळे प्रत्येक हिस्सेदाराने माहिती कशी भरावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

याव्यतिरिक्त तलाठ्याकडे सर्वच सोई सुविधा उपलब्ध असून शेतातील सर्व माहिती त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे ई-पीक माहिती त्यांना स्वतः भरणे सोयीस्कर होणार आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या विचारात घेता शासनाने ही ई-पीक संबंधाची माहिती तलाठ्यांकडूनच भरून घ्यावी व शेतकऱ्यांना यातून मोकळे करावे, अशी मागणी टेमनी येथील शेतकरी ओमप्रकाश पटले, तिलकचंद पटले, मनीराम पंडेले, योगराज पटले, जीवन दमाहे, योगराज नागपुरे, हिरासिंग दमाहे, लक्ष्मीचंद नागपुरे, यांनी शासनाकडे केली आहे.

-------------------

खरोखरच शासनाने विचारलेली माहिती ही मोठ्या स्वरूपाची आहे. त्यामुळे ती अपलोड करताना शेतकऱ्यांना मोठी अडचण येत आहे. शासनाने यातून शेतकऱ्यांना सोपे होईल, असा मार्ग काढावा.

- शिवलाल नेवारे (शेतकरी तथा उपसरपंच ग्रामपंचायत, टेमनी)

-------------------

आम्ही प्रत्यक्षरीत्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करीत आहोत. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचाच फायदा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने माहिती भरून आपला सहभाग नोंदवावा. जर कुणाला अडचण भासली तर त्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.

- एम. आर.ठकरेले (तलाठी, चुलोद)

Web Title: E-crop survey should be done from Talatha itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.